Raigad News : कायद्याच्या बंधनामुळेच लोकसभेच्या निवडणुका; माजी मंत्री अनंत गीते यांची भाजपवर टीका

भाजपने पराभवाच्या भीतीने दोन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत.
anant geete over local body lok sabha election recent bjp politics
anant geete over local body lok sabha election recent bjp politicsSakal

Raigad News : भाजपने पराभवाच्या भीतीने दोन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत. सध्या सुरू असलेले राजकारण अत्‍यंत खालच्या स्‍तराचे आहे. ७० वर्षांत काँग्रेसनेही लोकशाहीचा अवलंब करीत निवडणुकीला सामोरे जात मतदारांचा कौल मिळवला होता.

दोन वर्षे कुठेही नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. कायद्याचे बंधन नसते तर कदाचित लोकसभा निवडणुकाही घेतल्या नसत्या, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी केली.

रोहा भाटे सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. आगामी निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवल्‍याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांनी स्‍वतःला झोकून देत काम करायचे आहे.

गावागावांत जाऊन जागृती करायची आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला मजबूत करण्यासाठी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन गीते यांनी केले. मेळाव्यास रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख समीर शेडगे, किशोर जैन, सुरेंद्र म्हात्रे, बळिराम घाग, चेतन पोटफोडे आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असून ते साकार केल्‍याशिवाय शिवसैनिकांना स्वस्थ बसणार नाही. लोकसभेला माझ्यासमोर कोणीही असू द्या, किमान दोन ते अडीच लाख मतांच्या फरकाने तो पडणारच अशा शब्दात गीते यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता इशारा दिला.

मोदींच्या फोटोशिवाय पर्याय नाही

अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाशी गद्दारी केल्यानंतर ते स्वतःच्या बॅनरवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा फोटो लावायचे. शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचे कान टोचले. त्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांचे फोटो लावणे बंद केले.

आता तर महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून स्वाभिमानी बाण दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मी गद्दारी केली नाही त्यामुळे निवडणुकीत जनतेसमोर सन्मानाने जाईन परंतु समाजात मानसन्मान नसल्याने त्यांना मोदींच्या फोटोशिवाय पर्याय नाही, अशा शब्दात गीतेंनी राष्ट्रवादी नेत्यांचा समाचार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com