आंगणेवाडी यात्रेची मोड यात्रेने सांगता 

Anganewadi Jatra over konkan sindhudurg
Anganewadi Jatra over konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची सांगता आज सायंकाळी मोड यात्रेने झाली. काल पहाटे यात्रेस सुरवात झाल्यानंतर रात्री साडेनऊ वाजल्यानंतर महाप्रसादाचा मुख्य ताटे लावणे सोहळा पार पडला. कोरोनाच्या संकट काळात आंगणे कुटुंबीय व प्रशासनाने केलेल्या आवाहनाला भाविकांनी यात्रेस उपस्थिती न दर्शविता केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी आभार मानले. 

कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे रात्री आंगणे कुटुंबीयांच्या घरी होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात गावाबाहेरील भाविकांना मात्र उपस्थित राहता आले नाही. काल रात्री व आजही पोलिस प्रशासनाने आंगणेवाडीत येणाऱ्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. आजच्या दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांना काही मिनिटाच्या अवधीतच देवीचे दर्शन घेता आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या जत्रोत्सवाचा मोठा फटका येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्यासह अन्य आंगणे कुटुंबीयांनी मेहनत घेतली. मंडळाच्यावतीने अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी भाविकांचे आभार मानले. साडेसहा वाजता मंदिरात उर्वरित धार्मिक विधी झाल्यावर मोड यात्रेने सोहळ्याची सांगता झाली. 

अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. मोहिते, उपविभागीय अभियंता श्री. मुगडे, विरण अभियंता श्री. सरवाळे, रामगड अभियंता मनीष सावंत, स्वप्नील धामापुरकर, प्रफुल्ल परब, अमित बागवे, मुरारी जांभळे, सचिन परब, संदिप परब, बळिराम गावकर, राठोड, महादेव नरे, सतीश आहीर, पींटु साळकर, महेंद्र घाडी, रुपेश लाड, विनोद परब आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आरोग्य विभागाच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विणा मेहेंदळे, डॉ. तृप्ती देसाई, डॉ. दीप्ती सूर्यवंशी तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

"ताटे लावणे' म्हणजे काय? 
काल रात्री मंदिरात ताटे लावण्याचा मुख्य सोहळा पार पडला. यात्रेदिवशी आंगणेवाडीतील प्रत्येक लहानथोर मंडळींचा उपवास असतो. प्रत्येक घराघरात महाप्रसाद बनविला जातो. प्रत्येक घरातील सुहासिनी मौनव्रत धारण करत हा बनवलेला प्रसाद नैवेद्य म्हणून घेऊन मंदिरामध्ये येतात. यालाच ताटे लावणे असे म्हणतात. सुहासिनीच्या डोक्‍यावरील असलेल्या प्रसादाच्या ताटाला कुणाचा धक्का लागू नये म्हणून महत्वाची एक व्यक्ती सोबत असते. रात्री दहाच्या सुमारास मंदिरात महाप्रसाद घेऊन आलेल्या सुवासिनी पुन्हा माघारी फिरल्या. रात्री 9 नंतर धार्मिक विधीसाठी दर्शन रांग बंद केली होती. महाप्रसादाचा "ताटे लावण्या'चा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री 11.30 वाजता पुन्हा दर्शन रांग सुरू झाली. यावेळी गोंधळ विधी झाला. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे रात्री आंगणे कुटुंबीयांच्या घरी होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी गावाबाहेरील भाविकांना प्रसाद मात्र घेता आला नाही. रात्री सुद्धा पोलिस प्रशासनाचा कडक बंदोबस्त होता. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com