रत्नागिरी : सीआरझेड कचाट्यातून 'हे' चार धूप प्रतिबंधक बंधारे मुक्त

Approval of Work Of Four Erosion Preventing Bunding in Ratnagiri
Approval of Work Of Four Erosion Preventing Bunding in Ratnagiri

रत्नागिरी - सीआरझेडच्या परवानगीसाठी रखडलेल्या तालुक्‍यातील चार धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये वरवडे, सोमेश्‍वर, पोमेंडी खुर्द आणि जुवे येथील बंधाऱ्यांचा समावेश आहे. मात्र या कामांचे अंदाजपत्र 2016 मधील आहे. तीन वर्षांमध्ये या बांधकामाच्या साहित्याच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे. त्यांना हे आर्थिकदृष्ट्या अडचणीची ठरण्याची शक्‍यता असल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

रत्नागिरी तालुक्‍याचा बराचसा भाग समुद्रकिनारी किंवा खाडीला लागून आहे. त्यामुळे उधाणाची भरती आणि पावसाच्या दिवसात या किनाऱ्यांची लाटांमुळे प्रचंड धूप होते. तसेच लगतच्या घरांना उधाणावेळी किंवा पावसाळ्यात धोका निर्माण होतो. त्या अनुषंगाने आमदार उदय सामंत यांनी रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे किंवा क्रॉंक्रिटची भिंत उभारण्याबाबतची कोट्यावधीची कामे मंजूर करून आणली आहेत.

यामध्ये वरवडे येथील सुमारे 200 मीटरच्या बंधाऱ्यासाठी 1 कोटी 26 लाख, सोमेश्‍वर येथील 350 मीटर, पोमेंडी 350 आणि जुवे 250 मीटरच्या बंधाऱ्यासाठी प्रत्येकी सरासरी 70 ते 80 लाख, अशी कामे मंजूर केली आहेत.

2016च्या अंदाजपत्रकाप्रमाणे ही कामे तयार केली आहेत. त्यानंतर सीआरझेडची परवानगी न मिळाल्याने 3 ते 4 वर्षे ती रखडली होती. आता त्याला परवानगी मिळाली आहे. ज्या ठेकेदारांनी ही कामे घेतली आहेत, त्यांच्यासमोर वाढीव दराची मोठी अडचण आहे. अंदाजपत्रके 2016च्या दराप्रमाणे बनविण्यात आली होती. 

तीन वर्षानंतर बांधकामाच्या साहित्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला ती परवडणारी आहेत का आणि जरी ती केली तरी त्याचा दर्जा राहिल का? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. तसेच ही कामे संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी पत्तन विभागाची असणार आहे. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याप्रमाणे दरवर्षी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची कामे केली जातात आणि दरवेळी ती पाण्यात जातात. तीच री येथे ओढली जाऊ नये, या उद्देशाने अधिकाऱ्यांनी काम करून घेण्याची गरज आहे. 

आणखी तीन बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी

मांडवी, काळबादेवी आणि कसोप या तीन बंधाऱ्यांची कामे मंजूर आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याची अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता, निविदा आदी प्रक्रिया येत्या काही दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com