राजापूर तालुक्यात शेकडो एकरातील भातावर लष्करी अळी 

राजापूर तालुक्यात शेकडो एकरातील भातावर लष्करी अळी 

राजापूर - पुराच्या तडाख्यातून वाचून परिपक्व झालेल्या भातशेतीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या नद्यांच्या काठावरील शेकडो एकरावरील भातशेतीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. लष्करी अळीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या भातशेतीची कृषी विभागातर्फे पाहणी करून त्यावर मात करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांशी संवाद साधल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी एस. एस. जगताप यांनी दिली. 

शिवणे, शीळ, धामणपे आदी गावांमधील भातशेतीवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातून भात जमिनीवर पडलेले दिसत आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या भातशेतीची कापणी करण्यासाठी आठ-दहा दिवसांचा कालावधी आहे. त्या शेतीवर  फवारणी करणे शक्‍य आहे. मात्र दोन दिवसांमध्ये कापणी करणे गरजेचे आहे. त्यावर कोणत्याही फवारणी न करता शेतकऱ्यांनी कापणी उरकून घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

भातशेतीवर पडलेल्या लष्करी अळीचा बिमोड करण्यासाठी आवश्‍यक असलेली औषधे सद्यस्थितीमध्ये कृषी विभागात उपलब्ध नाहीत. मात्र जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना औषध खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

शेतकरी अडकला दुहेरी कात्रीमध्ये 
पुराच्या तडाख्यामध्ये बचावलेली भात शेती परिपक्व होवून कापणी योग्य झाली आहे. मात्र त्याच्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. नद्यांच्या काठावरील भागामध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे भातशेती कापता येत नाही आणि अळीचा प्रादुर्भाव झालेल्या परिपक्व भातशेतीवर फवारणी करायची तर भविष्यामध्ये भातावर औषधाची मात्रा राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे औषधांची फवारणी कशी करायची अशा दुहेरी कात्रीमध्ये शेतकरी सापडला आहे. 

अशी आहे लष्करी अळी 
परिपक्व झालेल्या पिकांची रात्रीच्यावेळी नासाडी केल्यानंतर ही अळी जमिनीच्या भेगांमध्ये किंवा पिकांच्या मुळात लपून बसते. दमट, ढगाळ वातावरण या किडीला पोषक असते. या शिवाय नदीलगतच्या पिकांवर ही कीड अधिक प्रमाणात आढळून येते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com