अरुणा धरणाचे स्वप्न अखेर दृष्टीपथात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

एक नजर

 • अरुणा प्रकल्प घळभरणीचा पहिला टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात
 • 12 मे पर्यंत हे काम होणार पूर्ण. 
 • तब्बल 13 वर्षे या धरणाचे काम सुरू
 • या प्रकल्पांवर आतापर्यंत 1 हजार 3 कोटी रुपये खर्च
 • वैभववाडी तालुक्‍यातील 17 आणि राजापुर तालुक्‍यातील दोन, अशी एकुण 19 गावे  या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात.

वैभववाडी - अरुणा प्रकल्प घळभरणीचा पहिला टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून 12 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तब्बल 13 वर्षे या धरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांवर आतापर्यंत 1 हजार 3 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

तालुक्‍यातील 17 आणि राजापुर तालुक्‍यातील दोन, अशी एकुण 19 गावे लाभक्षेत्र असलेल्या अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे 2006 पासून काम सुरू आहे. सुरूवातीला अतिशय गतीने काम झाल्यानंतर गेली काही वर्ष विविध कारणांमुळे संथगतीने काम सुरू होते. धरणग्रस्तांच्या विविध मागण्या, अपुरा निधी यामुळे या प्रकल्पाचे काम सातत्याने चर्चेत होते. शासनाने 60 टक्के काम पूर्ण झालेला प्रकल्प तातडीने पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेतून या प्रकल्पाला 1600 कोटी रुपये निधीची सुधारीत मान्यता मिळुन निधी देखील प्राप्त झाला. त्यामुळे धरणाचे काम गतीने सुरू झाले. 

अरुणा प्रकल्प घळभरणीचा पहिल्या टप्प्याच्या कामाला जानेवारी 2019 मध्ये सुरूवात झाली. घळभरणीच्या कामाला सुरूवात होताच प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाचे काम होत नाही तोपर्यंत घळभरणीचे काम सुरू करू नये, अशी मागणी करीत घळभरणीच्या कामाला विरोध दर्शवला होता; परंतु घळभरणीचे काम कोणत्याही स्थितीत रोखता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत पाटबंधारे विभागाने प्रशासनाच्या आदेशानुसार काम सुरू ठेवले. युद्धपातळीवर घळभरणीचे काम सुरू असून 12 मे पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात धरणात नियोजित पाणीसाठ्याच्या निम्मा पाणीसाठा केला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात वैभववाडी तालुक्‍यातील 17 गावे तर राजापूर तालुक्‍यातील 2 गावे आहेत. या धरणाचा थेट फायदा 19 गावांना होणार असून अप्रत्यक्ष फायदा कित्येक गावांना होणार आहे. या धरणामुळे 5 हजार 310 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

अरूणा प्रकल्प घळभरणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी केवळ सहा मीटर भराव बाकी आहे. येत्या 12 मे पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. 
- राजन डवरी,
कार्यकारी अभियंता, पाटंबधारे विभाग 

अरूणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प 

 • प्रकल्पाला मान्यता - 54 कोटी 
 • प्रकल्पावर आतापर्यंत खर्च - 1 हजार 3 कोटी 
 • ओलीताखाली येणारे क्षेत्र - 5310 हेक्‍टर 
 • लाभक्षेत्राखालील गावे- 19 
 • पंतप्रधान "कृषी'तून 1600 कोटींची सुधारीत मान्यता 
 • बुडीत क्षेत्रातील गावे- आखवणे, भोम आणि नागपवाडी. 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aruna Dam project first phase work ends soon