Loksabha 2019 : अशोक वालम ठरणार शिवसेनेसाठी डोकेदुखी 

राजेश कळंबटे
मंगळवार, 19 मार्च 2019

रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले.

रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले. स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणेंशी वालम यांची वाढती जवळीक आणि राजापूर विधानसभेला उमेदवार उभा करण्याची वालम यांची घोषणा शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. 

प्रकल्पविरोधी संघटनांचे राजकारणात रूपांतर होते याची अनेक उदाहरण राज्यात नव्हे, तर देशभरात आहेत. त्याचाच प्रत्यय नाणारच्या निमित्ताने आला. वालम यांनी अडीच वर्षांपूर्वी रिफायनरी विरोधात उडी घेतली. तेव्हापासून वालम राजापूर विधानसभेसाठी ऐच्छिक उमेदवार असू शकतात,अशी चर्चा सुरू होती. रिफायनरी प्रकल्प रद्दच्या घोषणेनेनंतर काही दिवसांतच ती खरी ठरली. लोकसभेला स्वाभिमानकडून नीलेश राणे रिंगणात आहेत. ही निवडणूक राणेंनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी एकगठ्ठा मते मिळवण्यावर त्यांचा भर आहे.

रिफायनरीच्या निमित्ताने चौदा गावांतील ग्रामस्थ प्रकल्पविरोधी संघटनेत एकवटले आहेत. त्यात विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेला याचे श्रेय मिळू नये यासाठी स्वाभिमानकडून तजवीज सुरू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या जल्लोषात संघटनेकडून स्थानिक आमदारांऐवजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वाभिमानचे प्रोजेक्‍शन झाले. ती एकगठ्ठा मते शिवसेनेला मिळू नयेत यासाठी राजकारण सुरू झाले आहे.

वालम यांनी शिवसेनेसह आमदार साळवींची कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच कोकणशक्‍ती महासंघाच्या पारड्यात विधानसभेची जागा देणाऱ्यांना लोकसभेला पाठिंबा, असे वालम यांनी जाहीर केले आहे. विद्यमान आमदार शिवसेनेचे असल्याने सेना जागा महासंघाला सोडू शकत नाही. ती संधी स्वाभिमानकडून सहजरीत्या मिळू शकते.

रिफायनरी विरोधातील चौदा गावांतील मतांचे कडबोळं करण्यात वालम काहीअंशी यशस्वी ठरल्याने लोकसभेला शिवसेनेची ती डोकेदुखी ठरू शकते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण होत आहे. त्यात नाणारच्या चौदा गावांची भर पडू नये, यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू झाला आहे. 

विधानसभेचे लक्ष्य 
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना वालम यांनी राजापूरसह मुंबईतील दोन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा मनोदय व्यक्‍त केला. शिवसेनेसह रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत यांना प्रकल्प रद्दचे क्रेडिट जाहीर करताना मात्र विद्यमान आमदार राजन साळवींचा त्यात काहीच सहभाग नाही, हे वालम यांचे वक्‍तव्य राजकीय इच्छाशक्‍ती दर्शविणारे ठरते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok walam headache for Shivsena