वाजपेयी यांच्या अमोघ वाणीची सिंधुदुर्गवासीयांवरही जादू

राजेश सरकारे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कणकवली - पक्ष बांधणीच्या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. त्याकाळात त्यांनी केलेले भाषण त्यांच्या अमोघ वाणीमुळे जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहे.

कणकवली - पक्ष बांधणीच्या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. त्याकाळात त्यांनी केलेले भाषण त्यांच्या अमोघ वाणीमुळे जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहे.

१९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. यानंतर कोकणात पक्ष विस्तारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८५ मध्ये सिंधुदुर्ग दौरा केला होता. त्यावेळी सिंधुदुर्गात भाजपची अवस्था जेमतेमच होती. तरीही त्यांनी १९८५ मध्ये जामसंडे-देवगड येथे सभा घेतल्याच्या आठवणी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी विषद केल्या.

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाजपेयी यांनी १९८० मध्ये नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर पक्ष विस्तारासाठी त्यांनी देशव्यापी दौरे केले. यात त्यांनी १९८५ मध्ये सिंधुदुर्ग दौरा केला होता. याची सुरवात त्यांनी फोंडाघाट येथून केली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले वाजपेयी फोंडाघाट येथील शासकीय विश्रामगृहात काही काळ थांबले असल्याची आठवण भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळा गाड यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितली. आपल्या अमोघ वाणीमुळे वाजपेयींनी पहिल्याच भेटीत सर्व कार्यकर्त्यांचे मन जिंकले होते. त्यावेळी दादा कुशे, प्रसाद पडते, डॉ. श्रीमती करंदीकर आदी अनेक जुन्या कार्यकर्त्यांशी वाजपेयी यांनी चर्चा केल्याच्या अंधूक आठवणी अजूनही स्मरणात असल्याचे श्री. गाड म्हणाले. त्यांनी सिंधुदुर्गातील पहिली सभा जामसंडे येथील आचरेकर कंपाऊंडमध्ये घेतली होती. 

या सभेसाठी जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते तसेच माजी आमदार अप्पा गोगटे, काका ओगले आदींसह अनेक भाजपचे जुने नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजप पक्ष संघटन, तसेच देशविकासाची दिशा, याबाबत सविस्तर मांडणी केली होती. त्यांनी आपल्या वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं होतं अशी आठवणीही भाजपच्या जुन्या जाणत्यांनी व्यक्‍त केल्या. 

वाजपेयी सर्वसमावेशक नेतृत्व...
 प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ आणि पुढे भाजपला दिशा देत सत्तेचे दिवस दाखवणारं सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयींची ओळख राहील, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी व्यक्‍त केले.

भारतीय जनता पक्ष आणि परिवार, तसेच भारतासाठी वाजपेयींचं जाणं ही एक दु:खदायक घटना आहे. त्यांनी शून्यातून भारतीय जनता पक्षाचीही निर्मिती आणि विश्‍वासार्हताही निर्माण केली. त्यांचेच नेतृत्व आणि कर्तृत्व घेऊन भाजपची पिढी घडत गेली. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष भाजप सिंधुदुर्ग

राजकीय क्षेत्रात सौम्य आणि सदैव आदर्शवत आणि देशहितासाठी कणखर भूमिका घेणारे नेतृत्व आज हरपले आहे. कारगिल युद्धात शत्रूपक्षाची धूळदाण उडवली. तर पोखरण येथे अणुचाचणी घेऊन जगात भारताचा त्यांनी दबदबा निर्माण केला. त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या विकासालाही अटलजींनी चालना मिळवून दिली.’’
 - अतुल काळसेकर, सदस्य भाजप प्रदेश कार्यकारिणी

अजातशत्रू राजकारणी, मुत्सदी आणि कणखर नेतृत्व अटलजींच्या रूपाने भारताला लाभलं होतं. आज त्या महापर्वाचा अस्त झाला आहे. अटलजींनी प्रत्येक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. परराष्ट्र मंत्री ते पंतप्रधान पदाची धुरा सांभाळताना त्यांची वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही.
- परशुराम उपरकर, मनसे प्रदेश सरचिटणीस

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी पंतप्रधान, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्व गमाविले आहे.’’
-  विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

भारतीय राजकारणातील आदर्श, संवेदनशील कवी, राष्ट्रभक्त जननेता, सहमतीच्या व संवादाच्या राजकारणावर ज्यांचा विश्वास होता. प्रत्येक भारतीयांचा श्वास आणि प्रेरणादायी नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या आदरणीय अटलजींचे निधन ही मनाला चटका लावणारी घटना आहे. अटलजींचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन समाजासाठी अविरतपणे काम करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
- नकुल पार्सेकर, अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान

Web Title: Atal Bihari Vajpayee Memory Sindhudurg