राजकीय कुरघोड्या वाढल्या ; निवडणुकीनंतर शमलेले वादळ घोंघावतंय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

विकासकामांतील चुका शोधून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रकार विरोधकांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कामथे बु. येथे राजकीय कुरघोड्या वाढल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर शमलेले वादळ पुन्हा घोंगावू लागले आहे. विकासकामांतील चुका शोधून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रकार विरोधकांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

तीन वर्षापूर्वी झालेल्या कामथे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून विजय माटे विजयी झाले होते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याने जिल्ह्यात याची चर्चा झाली होती. दरम्यान, सरपंच निवडणुकीत झालेली उपसरपंच निवडणूक वादग्रस्त ठरली. उपसरपंच निवडणूक प्रक्रियाच चुकीची राबवल्याची तक्रार विरोधकांनी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी व कोकण विभागीय आयुक्तांनी उपसरपंच निवड प्रक्रिया योग्य असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा -  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच ; मंत्रिपदाबाबत मात्र येणारा काळच उत्तर देईल -

या निर्णयाविरोधात विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या काही दिवसांत त्यावर सुनावणी आहे. त्यानंतर कामथेतील राजकीय वातावरण शांत होते. जावळेवाडी ते स्मशानभूमी रस्त्याबाबत अजित कासार यांनी तक्रार करीत सत्ताधाऱ्यांना पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. पंचायत समितीकडून कामथेतील रस्त्यांची चौकशी सुरू झाली आहे. रस्ता नियोजित ठिकाणी झालेला नसून सोयीच्या ठिकाणी केल्याचा आरोप अजित कासार यांनी केला होता. उपसरपंचांचा राजीनामा घेण्यासाठीचे डावपेच सुरू आहेत. सत्ताधारी गटाचे ४ तर विरोधी गटाचे ५ सदस्य आहेत. 

पाळेमुळे खणण्यास सुरवात

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांची पाळेमुळे खणण्यास सुरवात केलेली आहे. विरोधी गटातील काहींनी अवैधरित्या व्यवसाय, बांधकामे आणि  उत्खनन केलेले आहे. त्याबाबतचे पुरावे संकलित केले जात आहेत.

उपसरपंच पदाचे गणित

प्रदीप उदेग यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यास ‘उपसरपंच पदाचे गणित’ जुळत असल्याचा विश्‍वास विरोधकांना आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील प्रत्येक विकासकामांचा आणि विविध बाबींचा खीस काढून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचे प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा समजली -

"ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून विरोधक आमच्यावर टीकेची झोड उठवित आहेत; मात्र आम्ही त्यांच्यावर अजून चिखलफेक केलेली नाही. ग्रामपंचायत हे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन नाही. याउलट आपल्याकडून गावच्या आणि परिसरातील सामाजिक सेवेसाठी लाखो रुपये खर्च केले तरी त्याची जाहिरातबाजी कधी केली नाही. विरोधकांना विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठीच तक्रारींचा सिलसिला सुरू आहे."

- विजय माटे, सरपंच कामथे

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the atmosphere after election was changed political changes also done in ratnagiri