...तर शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. तेथे कोणत्याही परिस्थितीत विनायक राऊत नकोत, अशीही एकमुखी मागणी कार्यकर्त्यांची आहे. ही भावना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचविणार असल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी दिली.

कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. तेथे कोणत्याही परिस्थितीत विनायक राऊत नकोत, अशीही एकमुखी मागणी कार्यकर्त्यांची आहे. ही भावना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचविणार असल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात श्री. काळसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, जयदेव कदम, राजू राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘दोन दिवसांत आम्ही आठही तालुक्‍यांतील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यात खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली. मागील लोकसभा निवडणुकीनंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत या सर्वच निवडणुकांत शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचे काम केले. प्रसंगी राणेंच्या स्वाभिमान पक्षाशी युतीदेखील केली. त्यामुळे शिवसेनेशी युती नको आणि उमेदवार म्हणून श्री. राऊत मुळीच नको, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सोमवारी (ता.११) कणकवली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. यात जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडणार आहोत, तर रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्यांची भावना बाळ माने सांगणार आहेत. त्यानंतर या बैठकीचा अहवाल जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या मार्फत प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्याकडे पाठवला जाणार आहे.’’

आम्ही युतीचा धर्म पाळला; पण प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने रंग बदलला. बांदा येथे आमचा उमेदवार पाडण्यासाठी त्यांनी स्वाभिमान पक्षाशी युती केली. दोडामार्गमध्ये राजन म्हापसेकर यांच्या पराभवासाठी कारस्थाने रचली. वेंगुर्लेतही आमचा नगराध्यक्ष निवडून येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. हे सर्व होत असताना श्री. राऊत यांनी कोणतीही समन्वयाची भूमिका घेतली नाही. कुठल्याही कमिटीवर भाजप कार्यकर्त्यांना स्थान दिले नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा श्री. राऊत यांच्यावर राग असल्याचे श्री. काळसेकर म्हणाले.

प्रभू आणि राऊत यांची तुलनाच होऊ शकत नाही
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, पारंपरिक मच्छीमारांचा प्रश्‍न, सीआरझेड, वनसंज्ञा आदी प्रश्‍न सोडविण्यासाठी श्री. प्रभू यांनी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे तर श्री. राऊत उद्‌घाटने करीत असलेल्या टॉवरलाही  श्री. प्रभू यांनी मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत श्री. प्रभू हेच उमेदवार असायला हवेत. त्यांची आणि श्री. राऊत यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे श्री. काळसेकर म्हणाले.

पारकर, रावराणे भाजपचाच प्रचार करतील
भाजपचे युवा नेते संदेश पारकर शिवसेनेच्या एक-दोन कार्यक्रमांना गेले असतील; पण ते भाजपचेच आहेत. अतुल रावराणेही नाराज नाहीत. ही दोन्ही नेते आम्ही सांगू तसेच काम करतील आणि भाजपचाच प्रचार करतील, असे श्री. काळसेकर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Kalsekar comment