ग्राहकाने विसरलेली बॅग ढाबा मालकाने केली परत

सुनील पाटकर
शुक्रवार, 11 मे 2018

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथील सायली ढाब्यावर ग्राहकाने विसरलेली 50 हजार रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असणारी बॅग ढाबा मालकाने मूळ मालकाला प्रामाणिकपणाने परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल पोलादपूरच्या कर्तव्य प्रतिष्ठान कडून सायली ढाबा मालक बाबाजी घाडगे व कामगारांचा सन्मान करण्यात आला

मुंबई- गोवा व महाबळेश्वर कडे जाणारे प्रवासी व पर्यटक नाश्ता व जेवणासाठी पोलादपूरमध्ये थांबतात. पोलादपूर सोडल्यानंतर गोव्याकडे जाताना डाव्या बाजूला असणाऱ्या बाबाजी घाडगे यांच्या मालकीच्या सायली ढाब्यावर ठाण्याचे रहिवासी असणारे व दहिसर येथे अंधांसाठी संस्था चालवणारे चंद्रकांत साटम हे 10 मे ला चहापाण्यासाठी थांबले होते . येथून राजापूरला गावी जाताना घाईघाईत आपल्या जवळील बॅग ते सायली ढाब्यावरच विसरून गेले. या बॅग मध्ये 50 हजार रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती.

साटम यांना रत्नागिरीच्या पुढे गेल्यावर सदर बाब लक्षात आली. लगेच त्यानी पोलादपूरचे पूर्व परिचित कर्तव्य प्रतिष्ठानचे अॅड. प्रशांत भूतकर याना संपर्क करून याबाबत माहिती दिली. ही बॅग बाबाजी घाडगे यांनी जपून ठेवली होती. सदर बॅग कर्तव्यचे सचिन मेहता यांच्या ताब्यात बाबाजी घाडगे यांनी रक्कम व कागदपत्रांची खातरजमा करून दिली. दुसऱ्या दिवशी साटम राजापूर परत आल्यावर त्यांच्याकडून व कर्तव्य प्रतिष्ठान कडून सायली ढाबा मालक बाबाजी घाडगे व कामगारांचा सन्मान करण्यात आला . यावेळी कर्तव्य प्रतिष्ठान संस्थेचे सचिन मेहता, अॅड. प्रशांत भुतकर, उमेश सवादकर, शैलेश तलाठी, अशोक बुटाला, सहयोग प्रतिष्ठानचे विजय दरेकर व अॅड. सचिन गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

Web Title: bag returned by dhaba owner to customer