बालनाट्य संमेलनाच्या उद्‌घाटकपदी सेजल कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

रत्नागिरी - शहरातील शिर्के हायस्कूलची विद्यार्थिनी बाल अभिनेत्री सेजल कदम हिला नांदेड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाची उद्‌घाटक बनण्याचा मान मिळाला आहे. 6 ते 8 जानेवारीला बालनाट्य संमेलन होणार आहे. एकपात्री स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्यानंतर सेजल हिला ही संधी मिळाली आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी शाखा आणि अहन क्रिएशन रत्नागिरी यांच्या वतीने 8 ते 15 वयोगटातील स्पर्धकांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 24 डिसेंबरला या जिल्हास्तरीय स्पर्धेत सेजलने द्वितीय क्रमांक मिळवला. सर्व शाखांमधून या पद्धतीने पहिले तीन क्रमांक मुंबईच्या मध्यवर्ती शाखेत पाठविण्यात आले व सोडत पद्धतीने बालनाट्य संमेलनाचे उद्‌घाटक निवडण्यात आले. रत्नागिरी शाखेतून आर्यन कासारे (प्रथम), सेजल कदम (द्वितीय), परिघा इंदुलकर (तृतीय) अशा तीन विजेत्यांची नावे पाठविण्यात आली. यातून सेजलची निवड झाली.

तिला नाट्य आणि नृत्य क्षेत्रांची आवड आहे. या क्षेत्रात जाण्यासाठी आमचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. आता उद्‌घाटनाची संधी तिला मिळाली, याचे आम्हाला अपूर्व समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सेजलचे आई-वडील कोमल व मिलिंद कदम यांनी दिली.

उद्‌घाटक बनेन असे वाटले नव्हते. म्हणजे नेमके काय, तेही पूर्णपणे माहिती नाही. तेथे अभिनय करायला सांगितला तरीही तो करेन. स्पर्धेत भाग घेतला; मात्र क्रमांक मिळेल असे वाटले नव्हते. नाटकात अभिनय करायला मला आवडतो.
- सेजल कदम

Web Title: balnatya sammelan sejal kadam