कोकणात वर्षा पर्यटनासाठी जाताय, मग हे प्रथम वाचा...

भूषण आरोसकर
Sunday, 28 June 2020

पावसाळा आला की वर्षा पर्यटनासाठी आंबोलीमध्ये पर्यटकांची एकच गर्दी होते; मात्र यंदा करण्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या आंबोलीतील धबधब्याजवळ पर्यटकांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन स्थळावर नागरिकांना येण्यास बंदी घातल्याने आज रविवारी अनेक पर्यटकांना पोलिसांनी माघारी पाठवले. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. तेथे आंबोली व सावंतवाडी येथील पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांची नियुक्ती देखरेखीसाठी करण्यात आली आहे. 

पावसाळा आला की वर्षा पर्यटनासाठी आंबोलीमध्ये पर्यटकांची एकच गर्दी होते; मात्र यंदा करण्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या आंबोलीतील धबधब्याजवळ पर्यटकांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार तसेच पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सूचना दिल्या.

पर्यटनस्थळावर आज रविवार असल्याने पर्यटक येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला असल्याने सावंतवाडी पोलिसांकडून आंबोली येथील विविध भागातील पर्यटनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरवर्षी आंबोलीमध्ये गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सांगली यांसह सिंधुदुर्गातील मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.

त्यावेळी ते धबधब्याखाली स्नानाचा आनंद घेतात तसेच आंबोली येथे असलेल्या हिरव्या गार वनराईमध्ये स्नेहभोजनाचा आनंद घेतात; मात्र यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सर्व पर्यटकांचा हिरमोड झाला. आंबोली येथील मुख्य धबधबा, महादेवगड, कावळेशेत पॉईंट, चौकुळ, हिरण्यकेशी, नांगरतास, सनसेट पॉईंट आदी सर्व पर्यटनस्थळावर सावंतवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, पोलिस उपनिरीक्षक नितीन नरके, पोलिस उपनिरीक्षक अमित गोते आदी अधिकाऱ्यांनी आंबोली, चौकुळ येथील पर्यटनस्थळावर भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. आंबोली येथे चेक पोस्टवरही पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये तीन पोलिस अधिकाऱ्यांसह 15 पोलिस कर्मचारी आणि 3 होमगार्ड अशी टीम आंबोली, चौकुळ येथील पर्यटनस्थळावर कार्यरत राहणार आहे.

गेले दोन दिवस आंबोलीतील पर्यटनस्थळावर वर्षा पर्यटन निमित्त गर्दी होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने आदेश जाहीर करत जिल्ह्यातील सर्वात पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घातली आहे. असे असतानाही आज आंबोली येथे बरेच पर्यटक दाखल झाले होते. सकाळच्या सुमारास काही पर्यटकांच्या गाड्याही आंबोली घाट परिसरात दिसून येत होत्या. यावेळी तेथे पेट्रोलीयमसाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने त्यांना सूचना देत माघारी पाठवले. आज पर्यटकांवर कारवाई करण्यात आली नाही; मात्र उद्यापासून आंबोली घाटात दाखल होणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली. 

बेरोजगारीची कुऱ्हाड 
दरवर्षी आंबोली येथे लाखोच्या संख्येने पर्यटक विविध पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. यावेळी तेथील विविध प्रकारच्या खाद्य तसेच हॉटेल व्यावसायिकांना फायदा होतो. यातून बराच रोजगारही प्राप्त होतो. पुरेसे आर्थिक चलनही मिळते. पाच ते सहा महिने आंबोली घाट माथ्यावरील पर्यटनाचा हंगाम चांगलाच बहरलेला असतो. यामुळे लॉजिंग, हॉटेल व्यवसायिक छोटे-मोठे खाद्य विक्रेते यांना याचा फायदा होऊन आर्थिक लाभ प्राप्त होतो; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांवर आधारित असलेला रोजगारावर गदा आल्याने मोठी नाराजी आहे. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban On Monsoon Tourism In Konkan Sindhudurg Marathi News