स्टार सिंधुदुर्ग आरसेटीमुळे रोजगाराची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

कुडाळ : बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार सिंधुदुर्ग आरसेटीने व्यवसाय कौशल्य उपक्रमांतर्गत नऊ वर्षांत जिल्ह्यातील 3726 युवक-युवतींना विविध प्रकारचे स्वयंरोजगाराचे 134 कोर्सचे प्रशिक्षण दिले. त्यापैकी 2103 व्यक्तींनी स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू केला, अशी माहिती पत्रकार परिषदेत आरसेटीचे संचालक पी. आर. नाईक यांनी दिली.

2017-18 या वर्षात विविध 60 प्रकारचे कोर्सेस असणार आहेत. 

कुडाळ : बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार सिंधुदुर्ग आरसेटीने व्यवसाय कौशल्य उपक्रमांतर्गत नऊ वर्षांत जिल्ह्यातील 3726 युवक-युवतींना विविध प्रकारचे स्वयंरोजगाराचे 134 कोर्सचे प्रशिक्षण दिले. त्यापैकी 2103 व्यक्तींनी स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू केला, अशी माहिती पत्रकार परिषदेत आरसेटीचे संचालक पी. आर. नाईक यांनी दिली.

2017-18 या वर्षात विविध 60 प्रकारचे कोर्सेस असणार आहेत. 

श्री. नाईक म्हणाले, ''बॅंक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसेटीची स्थापना 22 डिसेंबर 2009 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या धोरणानुसार झाली. आरसेटी म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक बेरोजगारीचे निर्मूलन हा मुख्य उद्देश व त्याचबरोबर व्यावसायिकांमधून उद्योजक घडविणे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे काम चालू आहे. व्यावसायिक कौशल्यासोबत व्यक्तिमत्त्व विकास व विविध सॉफ्ट स्किलचे अभ्यासक्रम अत्यंत सुलभ सोप्या पद्धतीने शिकविले जातात, हे संस्थेचे वैशिष्ट्य होय. गरजूंना अन्न देण्यापेक्षा अन्न मिळविण्याची क्षमता निर्माण करून स्वावलंबी बनविणे हे ध्येय समोर ठेवून आजपर्यंत जिल्ह्यात 3726 तरुण-तरुणींना 134 प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षित करून त्यापैकी 2103 व्यक्ती स्वत:चा उद्योग व्यवसाय करत आहेत. विविध सरकारी बॅंकांमार्फत कर्ज सुविधा मिळवून देणे हे संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य होय. 

बॅंक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर, झोनल मॅनेजर, रिझर्व्ह बॅंकेचे उच्चाधिकारी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, विविध सरकारी अधिकारी यांचे सहकार्य नेहमीच संस्थेला लाभत असून आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची आपुलकीही संस्थेला लाभली आहे. सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर तसेच जिल्ह्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक के. बी. जाधव, संस्थेच्या कार्यात नेहमीच सक्रिय साथ देतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व बॅंका व त्यांचे शाखाधिकारी यांनी संस्थेच्या लाभार्थींना प्राधान्याने अर्थपुरवठा करण्यात नेहमीच सहकार्य केले आहे. 

2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 27 कार्यक्रम झाले आहेत. तसेच यात प्रत्यक्षात व्यवसाय करीत असणारे लाभार्थी 563 आहे. त्यामध्ये 256 जणांनी बॅंक कर्ज घेऊन व्यवसायात पाऊल टाकले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये विविध असे 60 व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शिवणकला, अगरबत्ती बनविणे, उद्योजकता विकास प्रशिक्षण, फास्ट फूड स्टॉल उद्योग, पापड, लोणचे, मसाले तयार करणे, प्लंबिंग आणि सॅनिटरी वर्क, उद्योजकता विकास प्रशिक्षण, भाजीपाला, रोपवाटिका, बांबू, हस्तकला, डेरी फार्मिंग, गांडूळखत, लाईट मोटार प्रशिक्षण, फोटो फेमिंग, ब्युटी पार्लर, ज्युट बॅग बनविणे, पोल्ट्री व्यवस्थापन आदी उपक्रमांचा समावेश आहे. 

अनेक उद्योजकांच्या यशोगाथा 
आरसेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांच्या उद्योग क्षेत्रातील यशोगाथा आहेत. शिवापूर बौद्धवाडी येथील प्रतीक्षा कदम या महिलेने बांबू वस्तूत गोवा येथे उत्स्फूर्त व्यवसाय केला तसेच नागेश प्रदीप सारंग या युवकाने कोरजाई (ता. वेंगुर्ले) ट्रॅव्हल आणि टुरिझम व्यवसाय यशस्वी केला असून बोटिंग व्यवसायाकडे दिमाखात वाटचाल केली आहे. नोकरीसाठी फिरत असताना त्याला याबाबतचे मार्गदर्शन आरसेटीकडून मिळाले.

Web Title: Bank of India helping youths to start their business