esakal | भालाफेकपटू नीरजच्या रूपात साकारले बाप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : भालाफेकपटू नीरजच्या रूपात साकारले बाप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई करून तो कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याच्या कौतुकाचे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. आता तर रत्नागिरीतील मूर्तिकार आशीष संसारे यांनी भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या पोझमधील दीड फुटाची गणेशमूर्ती साकारली. ही मूर्ती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रतिष्ठापित केली जाईल. ही मूर्ती सध्या रत्नागिरीकरांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

माजी कुलगुरू डॉ. देशमुख यांची रत्नागिरीशी नाते आहे. ते स्वतः हौशी असल्याने दरवर्षी नवनवीन थीमवर मूर्ती असावी, अशी त्यांची इच्छा असते. यंदा सुवर्णपदक मिळविलेल्या नीरजच्या स्वरूपात गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना त्यांनी मूर्तिकार आशीष संसारे यांना बोलून दाखविली. त्यानुसार संसारे यांनी नीरजच्या रूपातील भालाफेक करताना अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे.

डॉ. देशमुख गेली सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ संसारे यांच्याकडूनच मूर्ती नेत आहेत. याआधी त्यांनी प्रो- कबड्डी सुरू झाल्यावर उंदरांसोबत कबड्डी खेळताना गणपती, झाड लावणारा गणपती अशा वेगवेगळ्या स्वरूपातील गणेशमूर्ती संसारे यांच्याकडून साकारून घेतल्या आहेत. गणेशमूर्तीसाठी ते आरासही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण करतात.

हेही वाचा: कोकणातील चिपी विमानतळावरुन श्रेयवाद रंगणार; राणेंनी केली 'ही' घोषणा

आशिष संसारे हे रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांचा पिढीजात गणेशमूर्ती कारखाना आहे. त्यांचे आजोबा रघुनाथ सखाराम संसारे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वडील अशोक संसारे, काका प्रभाकर संसारे यांनी सुरु ठेवली. आता त्यांचा हा वारसा आशिष संसारे सांभाळत आहेत.

माजी कुलगुरू डॉ. देशमुख यांच्या घरी

ही गणेशमूर्ती दीड फूड उंच आहे. शाडू मातीतील गणेशमूर्ती असून दोन पायावर तोल सांभाळून भालाफेक करतानाची ही मूर्ती साकारणे निश्चितच आव्हानात्मक होते. माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी जाण्यासाठी ही गणेशमूर्ती आज ता. ७ रोजी रत्नागिरीतून निघाली. देशमुख यांचे मित्र राहुल औरंगाबादकर यांनी ही जबाबदारी पेलली आहे.

डॉ. संजय देशमुख हे आमच्याकडून गेली १५ वर्षे मूर्ती बनवून घेत आहेत. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे यंदाची मूर्ती साकारताना विशेष आनंद झाला. ट्रॅक व फिल्डमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच सुवर्णपदक विजेत्या नीरजची मूर्ती साकारणे नक्कीच माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे.

loading image
go to top