मद्यपींची नाराजी झाली दूर ; मद्यविक्री आता रात्री १० पर्यंत

राजेश शेळके
Saturday, 10 October 2020

जिल्हा प्रशासनाने आज नवीन आदेश काढून व्यवसायिक आणि तळीरामांना मोठा दिलासा दिला. 

रत्नागिरी : तळीराम आणि मद्य विक्री करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. लॉकडाउनमध्ये बंद झालेले बारचे दरवाजे दोन दिवसांपूर्वी खुले झाले. मात्र वेळेच्या मर्यादेमुळे व्यावसायिक, तळीराम नाराज होते. बार बंद करण्याची वेळ सायंकाळी सहा होती. परंतु जिल्हा प्रशासनाने आज नवीन आदेश काढून व्यवसायिक आणि तळीरामांना मोठा दिलासा दिला. 

हेही वाचा - बांदा-संकेश्‍वर राज्य मार्गाचा प्रश्‍न ; महामार्ग सावंतवाडीतूनच जावा

जिल्ह्यातील सर्व बार सकाळी साडे अकरा ते रात्री दहापर्यंत खुले ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) याला बंदी असणार आहे. 
शासनाला सर्वाधिक महसुल देणार्‍या व्यवसायामध्ये मद्यविक्री येते. करांपोटी वर्षाला जिल्ह्यातून सुमारे 10 ते 12 कोटीचा महसुल शासनाला जातो. मात्र टाळेबंदीमुळे हे सर्व बुडाले. व्यवसायिकही अडचणीत आले आणि शासनाचा कोट्यवधीचा करही बुडाल्याने प्राधान्याने शासनाने मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

रेस्टॉरंट व बारमधील व्यवहार सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन राज्यातील खाद्यगृह व बार 50 % क्षमतने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. लॉकडाउननंतर दोन दिवसांपूर्वीच बारचे दरवाजे खुले झाले. मात्र त्याला वेळेचे बंधन घातले होते. मद्य आणून ठेवून पिणारे कमी आणि आयत्यावेळी पार्ट्या किंवा बैठकीला बसणारे अनेक आहेत. त्यामुळे मद्याची विक्री सायंकाळी अधिक होते. याबाबत व्यवसायिकांनी प्रशासनाकडे कैफियत मांडली होती. 

जिल्हा प्रशासनाने आजपासून बार रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. मात्र कोरोना काळ असल्याने सर्व अटी-शर्थींचे तंतोतंत पालन करण्याचे अटही त्यांना घातली आहे. 
जिल्ह्यात केवळ बार रात्री 10 पर्यंत खुले राहतील. मात्र बिअर शॉपी, वाइन शॉप आणि देशी बार यापूर्वीच्या आदेशानुसार सायंकाळी सहा वाजता बंद करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा - कर्करोग, हृदयरोगासाठी मिळणार आता १५ हजार रुपये 

...तर होणार कारवाई

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी रेस्टॉरंट व मद्य व्यवहार सुरु करण्यासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अथवा यापैकी कोणत्याही अटी व शर्थींचे भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bar open till 10 pm in ratnagiri district administration take desicion todya in ratnagiri