esakal | तीन महिन्यापासून समुद्राच्या लाटांशी झुंज देणारे बसरा स्टार जहाज असे येणार बाहेर 
sakal

बोलून बातमी शोधा

The Basra Star ship will come out

गेल्या तीन महिन्यांमध्ये पावसाळ्यातील अनेक हायटाईड भरतीच्या लाटांचा तडाखा या जहाजाने सोसला आहे.

तीन महिन्यापासून समुद्राच्या लाटांशी झुंज देणारे बसरा स्टार जहाज असे येणार बाहेर 

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिर्‍या किनार्‍याला लागलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली तीन महिन्यानंतर सुरू झाल्या आहेत. जहाजाचा सर्व्हे करून ते समुद्रातून बाहेर काढण्यात येणार आहे. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

ऑर्गनायझेशनची टीम कधीही सर्वेसाठी येण्याची शक्यता आहे. 
मिर्‍या समुद्रकिनारी अडकलेल्या बसरा स्टार जहाजाला उद्या (ता. 3) तीन महिने पूर्ण होणार आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पावसाळ्यातील अनेक हायटाईड भरतीच्या लाटांचा तडाखा या जहाजाने सोसला आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगणारे हे जहाज बंधार्‍यावर आदळून खालून फुटले आहे. काही ठिकाणी चेपले गेले. केबिनच्या बाजुने जहाज फुटल्याने पाणी जाऊन ते किनार्‍यावर वाळुत रुतले आहे. 

जहाज वाचविण्याच्या दृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साह्याने जहाजावरील जळके ऑइल काढण्यात आले. सात हजार लिटर ऑइल बॅरलमध्ये काढण्यात आले आहे. त्यानंतर लगोलग जहाजामधील 25 हजार लिटर डिझेल काढण्यात आले. जहाजावरील इंधन रिकामे केल्यानंतर समुद्र किनारा सुरक्षित ठेवण्यास प्रादेशिक बंदर विभागाला यश आले. मात्र आता जहाज काढण्याची जटील समस्या बंदर विभाग आणि जहाज एजन्सीपुढे आहे. दुबई येथील बसरा स्टार कंपनीच्या अधिकार्‍यांनी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून जहाज काढण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे जहाज काढण्यात येणार आहे.

हे पण वाचामानलं या गावाला... तब्बल चाळीस वर्षांपासून इथे एकही दारूचा थेंब मिळत नाही

मिर्‍या येथे अडकलेले जहाज काढण्याचा निर्णय झाला आहे. कोणत्याही खासगी एजन्सीला हे काम न देता इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनला देण्यात आले आहे. समुद्रही आता शांत आहे. त्यामुळे सर्व्हे करून ऑर्गनायझेशनकडून लवकरच जहाज काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.
 
-कॅ. संजय उगल मुगल, प्रादेशिक बंदर अधिकारी रत्नागिरी

हे पण वाचा - खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजुला हो ; निलेश राणेंनी कोणाला दिले आव्हान

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image