
मंडणगड तालुक्यातील उन्हवरेच्या भूमीत निसर्गाचा अनमोल खजिना दडलेला आहे. जैवविविधता लाभलेल्या वैभवी परिसरात निसर्गाचे विविध आविष्कार समाविष्ट आहेत.
Mahashivratri 2020 - महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेल्या कुंडावर स्नान
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील उन्हवरेच्या भूमीत निसर्गाचा अनमोल खजिना दडलेला आहे. जैवविविधता लाभलेल्या वैभवी परिसरात निसर्गाचे विविध आविष्कार समाविष्ट आहेत. त्यातील एक म्हणजे भारजा नदीच्या डाव्या तीरावरील गरम पाण्याचे झरे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेल्या या कुंडावर महाशिवरात्रीला पहाटे स्नान व देवींच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होता.
हे पण वाचा - तुम्ही तुमच्या गाडीचा विमा उतरविला आहे का? नसेल तर ही बातमी वाचा
कुंडाच्या वरच्या बाजूला मंदिरात चंडिका, मुकाटा, वळजाई देवी स्थानापन्न आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी असून परिसरात असंख्य झाडे आहेत. गरम पाण्याचे कुंड जांभा दगडाने भरभक्कम बांधलेले आहे. महाशिवरात्रीला येथे स्नान व कुंडातील पाणी घरी आणण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच हजेरी लावली. मूळ स्रोत असणारे कुंडातील पाण्याचे तापमान 70 ते 80 अंश असून महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड असा याचा लौकिक आहे. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले असल्याने स्नानाचा आनंद उपभोगता येतो. कुंडातून बाहेर जाणारे गरम पाणी जेथे भारजा नदीला मिळते अशा पाण्यातही शंख-शिंपले, मासे, फिरताना पाहून आश्चर्य वाटते. आंबवणे खुर्द, तुळशी, पाले, वडवली, कोन्हवली, पालवणी, तोंडली, वेरल, नारगोली तसेच तालुक्यासह पर्यटक व श्रद्धावानांनी पहाटे तीन वाजल्यापासूनच आंघोळीसाठी हजेरी लावली होती. मंदिर परिसरात बाजार भरल्याने विविध वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. बारमाही पर्यटक, स्थानिकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे.
हे पण वाचा - धक्कादायक ; येथे कामगारांना मिळत नाही पिण्याचे पाणी
पर्यटकांसाठी विकेंड डेस्टिनेशन
या कुंडावर स्नान केल्याने विविध आजारांपासून माणसाची मुक्तता होते, त्वचा रोग बरे होतात अशी श्रद्धा आहे. धार्मिक तसेच विज्ञानप्रेमींनाही आकर्षित करणारं हे स्थळ स्थानिकांसह पर्यटकांचे विकेंड डेस्टिनेशन आहे. ज्यांना निसर्गरम्य परिसर व पक्षीनिरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे.