कोणाचा 'बा' जरी आला, तरी खांदे वाकणार नाहीत ; आता शिवसेनेचे धगधगते अग्निकुंड दिसेल

मुझफ्फर खान
Monday, 2 November 2020

80 वर्षाचा योद्धा एक डरकाळी फोडतो आणि संपूर्ण जगात त्याचे परिणाम उमटतात हे आमचे हिंदुत्व आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : शिवसेनाप्रमुख हे न संपणारे विचार आहेत. शिवसेनेची हिंदुत्वाची बैठक मजबूत झालेली आहे. 80 वर्षाचा योद्धा एक डरकाळी फोडतो आणि संपूर्ण जगात त्याचे परिणाम उमटतात हे आमचे हिंदुत्व आहे. ही आमची शिवसेना आहे. त्या शिवसेनेचे तुम्ही युवा सैनिक आहात. तुमचे खांदे इतके मजबूत असले पाहिजे की कोणाचा 'बा' जरी आला तरी ते खांदे वाकता कामा नये. आशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरले. 

कोरोना संपूदे शिवसेनेचे धगधगते अग्निकुंड संपूर्ण जिल्ह्यात दिसेल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते शहरप्रमुख निहार कोळे यांनी चिपळूण युवासेनेचा मेळावा बांदल हायस्कुल सभागृहात आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाधव 
म्हणाले, कोरोनामुळे गेले कित्येक महिने आपण एकमेकांपासून दूर होतो. परंतु आता थांबून चालणार नाही.

हेही वाचा - सातबारासाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यांची होणार आता चौकशी -

युवासेना ही शिवसेनेचे पुढचे भविष्य आहे. तुमच्या खांद्यावर पुढची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या पक्षात आपण काम करत आहोत त्याचा इतिहास माहीत असला पाहिजे. त्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठीच मी येथे आलो आहे, असे म्हणत त्यांनी अनेक जुन्या आठवणी आणि उदाहरणे समोर ठेवली.

शिवसेनेचे संघटन हे मजबूत असे संघटन आहे. मी राष्ट्रवादीत असताना देखील शिवसेनेच्या संघटन कौशल्याचे दाखले उघडपणे देत होतो. कारण ती शिवसेना आणि शिवसेनेची वैचारिक बैठक आम्ही पाहिली आहे. शिवसैनिक हा निखारा आहे. पण कधीकधी त्या निखार्‍यावर राख जमा होते. त्याला फुंकर मारावी लागते. तेच काम आता करावे लागणार आहे. त्यासाठीच मी पुढाकार घेतला आहे. मला आता युवासैनिकांशी संवाद साधायचा आहे.

15 वर्ष मी तुमच्यात नव्हतो. त्यामुळे आताच्या युवासैनिकाला माजी ओळख फारशी नसेल पण भास्कर जाधवाचे नाव नक्की तुम्हाला माहीत असेल. आता सुरुवात करूया. शिवसैनिक हा सळसळत्या रक्ताचा असतो. तो कधी थंड होत नाही. फक्त त्याला चेतवण्याची गरज असते, असे सांगतानाच त्यांनी कै. दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, साबीर शेख, दत्ताजी नलावडे यांच्या भाषणाचे दाखले दिले.

हेही वाचा - राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली -

येथे संघटना बांधणीला फारसा वेळ लागणार नाही. येत्या काही दिवसात कोरोना संपताच संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे धगधगते अग्निकुंड दिसून येईल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, युवासेना विस्तारक अतुल लोटणकर, युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे, बाळा कदम, तालुकाप्रमुख संदीप सावंत, प्रतापराव शिंदे, अण्णा कदम यांनी मार्गदर्शन केले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaskar jadhav said to youth shivsena activist in ratnagiri