तटकरेंविषयी नाराजीची किनार; जाधव-कदमांच्या भेटीनं राजकीय चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

राष्ट्रवादीमध्ये एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबूज गेले काही दिवस सुरू आहे.

तटकरेंविषयी नाराजीची किनार

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी खेड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही. पण या भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह खेड व गुहागर तालुक्यात राजकीय चर्चा, तर्कवितर्क सुरू झालेत.

हेही वाचा: कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीबाबत खलबतं

आमदार भास्कर जाधव आज खेड येथे रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांनी ही भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या वेळी संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम हेही उपस्थित होते. आमदार जाधव यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

आमदार जाधव राष्ट्रवादीमध्ये असताना माजी आमदार संजय कदम हे एकेकाळी त्यांचे जवळचे सहकारी ओळखले जात होते. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेत गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या दोन कुणबी समाजातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला थेट आव्हान दिले. यामध्ये एका कुणबी नेत्याला विधान परिषदेवर विचार करू, असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबूज गेले काही दिवस सुरू आहे.

हेही वाचा: एसटी संप चिघळणार, पडळकर आणि खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम

शीतयुद्ध जिल्ह्यात माहीत

दरम्यान, खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांचे असलेले शीतयुद्ध जिल्ह्यात माहीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे विद्यमान भास्कर जाधव यांच्या भेटीला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकारणात चर्चा रंगत आहे.

loading image
go to top