

Bhivbandar Nuclear Project
esakal
दापोली : दापोलीच्या निसर्गसंपन्न भूमीवर प्रस्तावित असलेल्या भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘दापोलीचा निसर्ग, शेती, बागायती आणि मच्छीमारी उद्ध्वस्त करणारा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. याविरोधात ऐतिहासिक लढा उभारू,’ असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी मंगळवारी दिला. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा आता राजकीय पातळीवरही तापण्याची चिन्हे आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गुजर बोलत होते. यावेळी नरेंद्र करमरकर, ज्योती विचारे, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, नगरसेवक संदीप चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुजर म्हणाले, ‘दापोलीची ओळख पर्यटन, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मासेमारी, आंबा-काजूच्या बागा आणि निसर्गसंपन्न परिसर अशी आहे. अशा तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा निर्णय घेताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते. आमचा विकासाला विरोध नाही; मात्र दापोलीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या विकासाला विरोध आहे.’
प्रकल्पामुळे मच्छीमार, शेतकरी आणि बागायतदारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दापोलीत जहाजबांधणी, ऑटोमोबाईलसह पर्यावरणपूरक उद्योग आणावेत आणि त्यातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार योगेश कदम यांच्या भूमिकेवरही गुजर यांनी सवाल उपस्थित केला. ‘एकीकडे प्रकल्पाची माहिती नव्हती असे सांगायचे आणि दुसरीकडे त्याला ग्रीन प्रकल्प म्हणायचे, ही भूमिका परस्परविरोधी आहे,’ असा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री उदय सामंत शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत असतील, तर शासनाने स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रकल्पाच्या परिसरात सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा आरोपही गुजर यांनी केला. या जमीन व्यवहारांची चौकशी करून त्यामागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
‘हा लढा आता केवळ एका गावापुरता मर्यादित राहणार नाही. गावागावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला जाईल. दापोलीचा निसर्ग आणि स्थानिकांचा हक्क वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारला जाईल,’ असा निर्धार गुजर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.