
राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रकाश गायकवाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कातळाचे फोडलेले दगड महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असतील
मुंबई गोवा मार्गावर येथे होतोय सर्वात मोठा भुयारी मार्ग
खेड ( रत्नागिरी ) - कशेडी घाटात भोगाव ते खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वात मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. खोदण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्र बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पद्धतीने भुयाराचे खोदकाम करण्यास बुमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर होत असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठीही यंत्राचा वापर केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रकाश गायकवाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कातळाचे फोडलेले दगड महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असतील. कशेडी घाटातील प्रवासाचे अंतर या भुयारी मार्गामुळे सुमारे 4.5 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे तसेच वाहनचालकांना कशेडी घाटातून धोकादायक वळणावरून गाडी चालवताना संभाव्य धोका यामुळे कमी होणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद ठेवण्याच्या घटनादेखील टळणार आहेत.
हेही वाचा - धक्कादायक ! `येथे` सीलबंद बाटलीऐवजी नळाच्या पाण्याची विक्री
खवटी येथून पावसाळ्यापूर्वीच भूयारी मार्गाचे काम सुरू झाले. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या भुयारी मार्गाचे अवलोकन केले होते. आजमितीस साधारणपणे 200 मीटर अंतराचा भुयारी मार्ग झाला आहे. काम पूर्ण होईल तेव्हा 1.84 किलोमीटर भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय म्हणून पूर्ण झाला असेल.
हेही वाचा - मुंबई - गोवा महामार्गालगतच्या वृक्षांवर पक्ष्यांसाठी घरटी
दुतर्फा ऍप्रोच रस्ते करण्याची गरज
2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी व्यक्त केली. या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या भुयारी मार्गाच्या दुतर्फा ऍप्रोच रस्ते करण्याची गरज आहे. 441 कोटी रुपये या भूयारी मार्गाचा एकूण खर्च आहे, अशी माहितीही दिली.