
पश्चिम रेल्वेकडून येणारी मडगाव ते हापा जाणाऱ्या जामनगर एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारामुळे रेल्वेतून मिळणारे सीलबंद बाटलीतील पाणी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धक्कादायक ! `येथे` सीलबंद बाटलीऐवजी नळाच्या पाण्याची विक्री
रत्नागिरी - सीलबंद पाणी बाटलीऐवजी रेल्वेगाडीतील नळाचे पाणी भरुन त्याची विक्री केल्याचा प्रकार जामनगर एक्स्प्रेसमध्ये जागृत प्रवाशांनी उघड केला. हा प्रकार रेल्वेतील कंत्राटी कर्मचाऱ्यानेच केला असून रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. न्यायालयात हजर केले असता 1500 रुपये दंड आणि दहा दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेकडून येणारी मडगाव ते हापा जाणाऱ्या जामनगर एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारामुळे रेल्वेतून मिळणारे सीलबंद बाटलीतील पाणी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मडगाव येथून पनवेलच्या दिशेने जाणारी जामनगर एक्प्रेसमधील प्रवाशाने गाडीतील केटरर्सच्या माणसांकडून पाण्याची बाटली मागितली होती. त्याने पाण्याची बाटली 15 रुपयांनी आणून दिली; परंतु दिलेली बाटली सीलबंद नसल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. याबाबत प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे सकाळी 9 वाजता जामनगर एक्स्प्रेस अर्धा तास रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून ठेवली होती.
हेही वाचा - मुंबई - गोवा महामार्गालगतच्या वृक्षांवर पक्ष्यांसाठी घरटी
रेल्वे पोलिस निरीक्षक अजित मधाळे, उपनिरीक्षक आर. एस. खांडेकर, कॉन्स्टेबल गजानन बोडके, पांडुरंग उपळेकर यांनी तत्काळ त्या गाडीतील संबंधित केटरर्सचा कंत्राटी कामगार रवींद्र नटवरलाल व्यास (रा. राजकोट) याला ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर रेल्वे ऍक्टनुसार कारवाई केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दंडासह साध्या कारावासाची कारवाई केली आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूका लढविण्यासाठी `येथे` काँग्रेसची तयारी
जामनगर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सील नसलेली बाटली विकणारी व्यक्ती कंत्राटी कामगार आहे. त्याच्याविरोधात कारवाई केली असून दूषित पाण्याचा पुरवठा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे.
- अजित मधाळे, पोलिस निरीक्षक, रेल्वे