पक्ष्यांची तहान भागवतात विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

वाटूळ येथील जिल्हा परिषद शाळेत उपक्रम; मुलांना पक्षी निरीक्षणाचीही संधी

राजापूर - हवेतील उष्म्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याने नैसर्गिक जलस्रोत घटले आहेत. त्याचा फटका प्राणी-पक्ष्यांना बसला. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे लक्षात घेऊन तालुक्‍यातील वाटूळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४ मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये पाणी आणि खाद्याच्या स्वतंत्र कुंड्या केल्या आहेत. या परिसरातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांना टंचाईच्या काळात या कुंड्यांचा आसरा मिळाला आहे.

मार्च-एप्रिल महिन्यातील वाढत्या उष्म्याचा नैसर्गिक जलस्रोतांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यातूनच पाणीटंचाईची समस्या गावोगावी उग्र रूप धारण करते. त्याचा फटका मानवी लोकवस्तीसह जंगलामध्ये मुक्तपणे विहार करणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांनाही सहन करावा लागतो. माणसाप्रमाणे त्यांनाही पाण्यासाठी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. पाणीटंचाईच्या काळात पक्ष्यांची पाण्याअभावी होणारी बिकट स्थिती लक्षात घेऊन वाटूळ शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आणि खाद्याच्या कुंड्या शाळेच्याच आवारामध्ये उभारण्यात आल्या. मुलेच या कुंड्यांची देखभाल करून त्यात पाणी आणि खाद्य ठेवतात. हा प्रयोग पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरला आहे.

परिसरातील विविध पक्षी पाणी आणि खाद्यासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या पक्ष्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते. उपक्रमशील शिक्षक श्री. जाधव यांच्या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आकार दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भूतदयाही जागृत होते.
 
पक्षी अभ्यासण्याची संधी
वाटूळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामध्ये तयार केलेल्या पाणी आणि खाद्याच्या कुंडीचा लाभ घेण्यासाठी या परिसरातील विविध प्रजातींचे पक्षी त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तकामंध्ये दाखविले जाणारे पक्षी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. त्यातच त्यांचे बारकाईने निरीक्षण करताना अभ्यासण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

Web Title: Bird thirst by students