सावरकरांकडून हातगाडीने स्वदेशी मालाची विक्री 

मकरंद पटवर्धन 
गुरुवार, 28 मे 2020

स्वा. सावरकरांची जन्मठेपेतून सुटका झाली. पण त्यांच्यावर अटी लादून रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले.

रत्नागिरी - रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी आहे. त्यामुळे स्थानबद्धतेत असताना त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न करत हिंदूंमध्ये क्रांती घडवली. आज स्वदेशीचा उद्घोष केला जात आहे. त्या काळात स्वदेशीची चळवळ रत्नागिरीत सर्वदूर पोचावी, म्हणून स्वा. सावरकर स्वतः हातगाडी फिरवून स्वदेशी माल विकत होते, अशी माहिती डॉ. कांबळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

वीर वि. दा. सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक कार्याने देशात मोठी सामाजिक क्रांती घडली. त्या वेळी वीर सावरकरसुद्धा भाषणांमध्ये एक वेळ माझी समुद्रातली उडी लक्षात ठेवली नाही तरी चालेल, "पतित पावन मंदिर' लक्षात ठेवा, असे सांगत होते. वीर सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक कार्याबाबत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. कांबळे यांनी संशोधन प्रकल्प सादर केला आहे. ते म्हणाले, कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सावरकरांचे कार्य पाहण्यासाठी आले असता, समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते की, सावरकरांनी मोठे काम केले आहे, त्यांना असेच काम करण्यासाठी आमचे उरलेसुरले आयुष्यसुद्धा लाभो. यावरूनच वीर सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य अजरामर ठरले आहे. 

हे पण वाचा - पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचं निधन

स्वा. सावरकरांची जन्मठेपेतून सुटका झाली. पण त्यांच्यावर अटी लादून रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर 1921 ते 23 या काळात रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात कैद होते. 1924 ते 1937 या काळात स्थानबद्ध केले. याच काळात सावरकरांनी हिंदू महासभेची स्थापना केली. स्वा. सावरकरांच्या भेटीसाठी हेडगेवार, मद्रासचे स्वातंत्र्यसैनिक व्ही. एस. अय्यर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मेहेरअल्ली आदी आले. हेडगेवारांनी नंतर रा. स्व. संघाची स्थापना केली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काय केले पाहिजे व हिंदू राष्ट्र म्हणून स्वा. सावरकरांच्या प्रेरणेतूनच अस्पृश्‍यता निवारणासाठी भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने पतित पावन मंदिराची उभारणी झाली. लग्नकार्यात मुसलमान लोकांचा बॅंड असायचा पण सावरकरांनी अस्पृश्‍य लोकांना प्रवृत्त करून बॅंड करण्यास सांगितले, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. 

हे पण वाचा -  'ती' टोळधाड कर्नाटकच्या उंबरठ्यावर, कृषी विभाग झालंय सज्ज... 

स्वदेशीची चळवळ 
प्लेगच्या साथीत सावरकर शिरगावामध्ये दामले यांच्या घरी राहायला होते. त्या वेळी पहिले संमिश्र हळदीकुंकू, संमिश्र दिंडी काढून "तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू' अशी साद दिली. 19 नोव्हेंबर 1930 मध्ये पतित पावन मंदिरात सहभोजन सुरू करून क्रांती घडवली. अखिल हिंदू गणेशोत्सवाची सुरवातही केली. स्वदेशीची चळवळ रत्नागिरीत सर्वदूर पोचावी म्हणून स्वा. सावरकर स्वतः हातगाडी फिरवून स्वदेशी माल विकत होते, अशी माहितीही डॉ. कांबळे यांनी दिली. 

साहित्यिक सावरकर 
रत्नागिरीत सावरकरांनी साहित्यिक म्हणूनही नावलौकिक मिळवला. उःशाप, उत्तरक्रिया, सन्यस्तखड्‌ग आदी नाटके व लेख लिहून त्यांनी वैज्ञानिकदृष्टीच्या प्रचार, प्रसाराची आघाडी उघडली. हिंदुत्व या विश्‍लेषणात्मक व विवेचनात्मक शास्त्रीय ग्रंथातून हिंदू राष्ट्राची गरज विशद केली. भाषाशुद्धीसाठी अनेक शब्द मराठीला दिल्याचेही डॉ. कांबळे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birth anniversary of Vinayak Damodar Savarkar