कणकवलीत का झाली भाजप आक्रमक ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

भाजप पदाधिकाऱ्यांनी कणकवली - आचरा, नांदगाव ते लिंगडाळ तिठा, फोंडाघाट ते वैभववाडी, विजयदुर्ग - वाघोटनसह अनेक रस्त्यांची कामे ठप्प असल्याबाबत कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - येथील सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना आज कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील भाजप पदाधिकाऱ्यांना घेराओ घातला. यावेळी वर्क ऑर्डर देऊनही रस्त्यांची कामे वर्षभर रखडल्याबद्दल अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. तसेच ही सर्व कामे 25 फेब्रुवारीपर्यंत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला. 

भाजप पदाधिकाऱ्यांनी कणकवली - आचरा, नांदगाव ते लिंगडाळ तिठा, फोंडाघाट ते वैभववाडी, विजयदुर्ग - वाघोटनसह अनेक रस्त्यांची कामे ठप्प असल्याबाबत कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. ठेकेदारांनी अनेक रस्त्यांची कामे अर्धवट ठेवली आहेत. बांधकामचे अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याने ही कामे होत नाही. यात प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय तर रस्ते दुरुस्त होत नसल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. 

भारतीय जनता पक्षाच्या कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना कणकवली येथील कार्यालयात घेराओ घातला. यावेळी उपअभियंता एस. पी. हिवाळे, के. के. निकम यांनाही कार्यकर्त्यांनी खडसावले. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी, मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, देवगड सभापती सुनील पालकर, कणकवली सभापती दिलीप तळेकर, जि. प. चे बांधकाम सभापती बाळा जठार ,भाजप जिल्हा पदाधिकारी प्रमोद रावराणे, जयदेव कदम, सुरेश सावंत, दिलीप रावराणे, श्री. हरयाण, संदीप साटम, रवींद्र शेटये, बबलू सावंत, भारती रावराणे, संदीप मेस्त्री, सोनू सावंत, महेश गुरव विश्वनाथ जाधव, राजन नाणचे, सदानंद हळदीवे, संतोष आग्रे उपस्थित होते. 

जबाबदारी ठेकेदाराने घेतलीय का ? 

कणकवली - आचरा या रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत आहे. या रस्त्यावर दरवर्षी प्रचंड प्रमाणात निधी खर्च होतोय. त्यामुळे केवळ रस्त्याचा ठेकेदार पोसण्यासाठीच कणकवली - आचरा रस्त्याची जबाबदारी ठेकेदाराने घेतलीय का ? असा प्रश्‍न भाजप कार्यकर्त्यांनी केला. कणकवली आचरा बायपास मार्गावरील आशिये गावातील मार्गावर 44 लाख रूपयांचा निधी खर्च झाला. प्रत्यक्षात तेवढे काम झालेले नाही. त्यामुळे या मार्गावर खर्च झालेल्या कामाचे फेरसर्व्हेक्षण करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तर देवगड - निपाणी, तरेळे - वैभववाडी, कासार्डे - विजयदुर्ग, नांदगाव - फोंडा, कासार्डे - फोंडा या रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. बांधकामचे अधिकारी आणि कर्मचारीही कसे सहभागी आहेत, याबाबतचीही माहितीही उपस्थित कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता शेवाळे यांना दिली. 

असरोंडी रस्ता तीन महिने बंद 

विजयदुर्ग - वाघोटन रस्ता दुरुस्त केव्हा होणार ? या प्रश्‍नावर अभियंता के. के. निकम आणि श्री. बासूदकर यांनी काम सरू असल्याचे उत्तर दिले. प्रत्यक्षात कामच सुरू नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी निकम आणि बासूदकर यांना खडसावले. फोंडा बाजारपेठेत गतवर्षी 6 जूनला काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे ग्रामस्थांनी काम रोखले. मात्र आता काम करायला कुणीही रोखलेले नाही. काम पुन्हा सुरू व्हायला एवढे दिवस का लागतात ? अशीही विचारणा कार्यकर्त्यांनी केली. तर असरोंडी रस्ता दुरुस्तीसाठी गेले तीन महिने बंद आहे. प्रत्यक्षात तेथे कामच सुरू नाही तर रस्ता बंद का? याचाही जाब कार्यकर्त्यांनी विचारला. 

काम 25 पर्यंत पूर्ण करु - शेवाळे 

वैभववाडी ते फोंडाघाट या रस्ता दुरुस्तीसाठी 70 लाख रुपये खर्च झाले, याबाबतची विचारणा उपस्थितांनी केली. आचरा - कणकवली रस्त्याचे खडीकरण करून काम थांबविले. आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने तरी हे काम पूर्ण व्हायला हवे होते. हे काम बंद ठेवण्याचे कारण काय ? याबाबतची विचारणा अभियंता शेवाळे यांना केल्यानंतर त्यांनी 25 पर्यंत पूर्ण करून घेतो, अशी ग्वाही दिली. 

कणकवली विभागातील 17 कामांना स्थगिती 

राज्यातील महाविकास आघाडीने अनेक विकासकामांना स्थगिती दिली आहे. यात कणकवली उपविभागातील 17 रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. यामध्ये देवगड - निपाणी राज्यमार्ग आणि हुंबरट - फोंडाघाट या मार्गाचा समावेश असल्याचे बांधकाम अभियंत्यांनी स्पष्ट केले; मात्र या रस्ता कामांवरील स्थगिती लवकर उठली नाही. तर भाजप कार्यकर्ते आपल्या स्टाईलने आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Activist Agitation Against PWD Engineer In Kankavali Sindhudurg Marathi News