जिल्ह्यात भाजपकडून "स्टार' प्रचारकांची फौज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कोकणात शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तेथे नेत्यांची फौज उतरविण्यापेक्षा सगळी ताकद मुंबईत लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उलट भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्टार प्रचारकांना उतरविण्यावर भर दिला आहे

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रचारात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवरच धुरा सोपविली आहे. मात्र भाजपने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण अशी स्टार प्रचारकांची फौज जिल्ह्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने दक्षिण रत्नागिरीवर लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्त्यांची फळी अपुरी असल्याने नेत्यांच्या सभा भाजपला तारणार का, याची चर्चा सुरू आहे.

मुंबईसह राज्यात महापालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना वर्चस्व टिकविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहे. या गडबडीत राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार सभांकडे नेत्यांचे दुर्लक्ष होणार आहे. कोकणात शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तेथे नेत्यांची फौज उतरविण्यापेक्षा सगळी ताकद मुंबईत लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उलट भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्टार प्रचारकांना उतरविण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिपळुणात सभा होणार आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले रमेश कदम शक्‍तिप्रदर्शन करणार आहेत. ही सभा 15 फेब्रुवारीला होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची दापोली-खेड मतदारसंघात सभा होईल. येथील शिवसेनेत सुरू असलेला वाद लक्षात घेता भाजपच्या या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रत्नागिरीत 14 फेब्रुवारीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिरगाव गटामध्ये कार्यक्रम आहे. नावडी, साखरपा, ओणी, सागवे येथेही श्री. प्रभू संवाद साधणार आहेत. दक्षिण पट्ट्यात शिवसेनेतील वाद उफाळून आले आहेत. त्याचा फायदा उठविण्यासाठी भाजप खेळी करीत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी भाजप नेते ताकद पणाला लावत आहेत. या घडामोडीत जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील जागा वाढविण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. बड्या नेत्यांच्या या सभांचा भाजपला किती फायदा होणार, हे आगामी काळातच ठरेल.

""निवडणूक प्रचारासाठी भाजपचे प्रमुख नेत्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. त्यात चिपळूण, खेड, दापोलीत सभा होतील. रत्नागिरी, लांजा, राजापुरात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू जनतेशी संवाद साधणार आहेत. विकासाद्वारे लोकांपर्यंत पोचणे हाच उद्देश आहे."'
- बाळ माने, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: BJP to contest aggressively in ratnagiri