युतीच्या भवितव्यावर ठरणार राणेंचा भाजप प्रवेश 

युतीच्या भवितव्यावर ठरणार राणेंचा भाजप प्रवेश 

कणकवली - भाजप - शिवसेनेची युती तुटली तर नारायण राणेंचा भाजपमधील प्रवेश निश्‍चित आहे; मात्र सद्यःस्थितीत त्यांना भाजप पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश अधांतरीच असल्याची भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज मांडली. राणेंबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असेही श्री. जठार म्हणाले. 

श्री. जठार यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजप वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, डामरेचे माजी सरपंच बबलू सावंत उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ""राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत; पण सद्यःस्थितीत शिवसेना काय भूमिका घेते यावरच राणेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग निश्‍चित होणार आहे. राणेंच्या भाजप प्रवेशावरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात मतमतांतरे आहेत. काहींचा विरोध तर काहींचा त्यांना पाठिंबा आहे; मात्र त्यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय आम्ही भाजप पक्षावर सोपवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.'' 

श्री. जठार म्हणाले, ""भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही यावर देखील राणेंचे भाजपमधील प्रवेशाचे भवितव्य अवलंबून आहे. जर युती तुटली तरी राणेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर होईल आणि युती झाली तर मात्र राणेंच्या प्रवेशामध्ये अडचण निर्माण होऊ शकते." 

...तर बंद घरे कायमची उघडतील 
सिंधुदुर्गात पुढील पाच वर्षांत ठोस असे पर्यटन प्रकल्प होऊ घातले आहेत. वैभववाडी - कोल्हापूर मार्ग पूर्णत्वास जाईल. तसेच जर रिफायनरी प्रकल्प झाला तर केवळ चतुर्थी सणात उघडणारी ग्रामीण भागातील घरे कायमस्वरूपी उघडतील आणि प्रत्येकाला रोजगाराची संधी मिळणार आहे, तसे साकडे श्रीगणेशाला घालणार असल्याचे श्री. जठार म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com