मच्छीमारांना हवी आहे आता कर्ज माफी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp district president rajan teli press conference in malavan kokan marathi news

मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाची समस्या भेडसावत असून मच्छीमारांना केंद्र, राज्य शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळालेली नाही.

मच्छीमारांना हवी आहे आता कर्ज माफी...

मालवण (सिंधुदूर्ग) : मत्स्यदुष्काळाच्या समस्येत येथील मच्छीमार होरपळत असून शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करत मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले जाईल. त्यांच्या माध्यमातून येत्या अधिवेशनात मत्स्यदुष्काळ तसेच मच्छीमारांची कर्जे माफ व्हावीत यासाठी आवाज उठविला जाईल अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

मच्छीमारांना भेडसावणार्‍या विविध समस्यांची दखल भाजप घेणार असून केंद्राच्या अखत्यारित असलेली मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावाही केला जाणार आहे. भाजप मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी अशोक सावंत, अशोक तोडणकर, विलास हडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष दीपक पाटकर, बाबा परब, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुका व शहराची उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा- दिव्यांग असूनही तिला शिकायच आहे पण....

मच्छीमारांनाही कर्जे माफी व्हायला हवी

श्री. तेली म्हणाले, मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाची समस्या भेडसावत असून मच्छीमारांना केंद्र, राज्य शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळालेली नाही. निसर्गातील बदलांमुळे मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत आहे. शेतकर्‍यांना जशी कर्जमाफी दिली जाते त्यानुसार मच्छीमारांचीही कर्जे माफ व्हायला हवीत. शिवाय नुकसान भरपाईही मिळायला हवी. शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा यासाठी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले जाईल. त्यांच्या माध्यमातून येत्या अधिवेशनात या समस्यांसदर्भात आवाज उठविला जाईल असे स्पष्ट केले. 

हेही वाचा - चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ...

कोकणावर अन्याय केला जात आहे

आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री येथे येत आहेत. पालकमंत्र्यांकडूनही कामकाजांचा आढावा घेतला जात आहे. मात्र ज्या कोकणाने शिवसेनेला मोठ्या प्रमाणात आमदार निवडून दिले. त्या कोकणावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत ज्या रस्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. त्या कामांची स्थगिती उठवावी यासाठी कणकवली, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्यात येणार आहे. जो निधी मागे गेला तो जिल्ह्याला पुन्हा मिळावा, चांदा ते बांदा योजना पुन्हा कार्यान्वित करावी यावरही लक्ष वेधले जाणार आहे. याची दखल मुख्यमंत्री निश्‍चितच घेतील अशी अपेक्षा श्री. तेली यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - सावधान ! तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा..

भाजप विरोधात सर्व पक्ष
जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा करत संघटना वाढीवर भर दिला जात आहे. सद्यःस्थितीत भाजप विरोधात सर्व पक्ष असे वातावरण आहे. जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या तिन्ही निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांचा पराभव करत विजय मिळविला आहे. त्यानुसार येत्या जिल्हा बँक, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ज्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही अशा कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल.

हेही वाचा- कोकणातील खालू बाजा घुमला दुबईत ...


हिंदुस्थानी रॅलीचे नियोजन

सीएए कायद्याला देशभरात विरोध होत असताना कायद्याच्या समर्थनार्थही रॅली काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही आम्ही हिंदुस्थानी या रॅलीचे नियोजन येत्या काळात केले जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी देवदत्त सामंत यांच्यात नाराजी असून ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसल्याबाबत विचारले असता सामंत यांच्यात कोणतीही नाराजी नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत ते सहभागी होते. ते शंभर टक्के भाजपसोबतच राहतील. भाजपात सर्वांचा सन्मान करत पक्ष संघटना पुढे नेली जाईल असेही श्री. तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.