राणे म्हणजे बुडीत गेलेली कंपनी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

आमदार नीतेश राणे यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आमदार झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत देवगडात कुठली विकासात्मक कामे केली. आमदार निधी देवगडात किती दिला ते जाहीर करावे. तत्कालीन जामसंडे ग्रामपंचायतीने केलेली कामेही त्यांच्यापेक्षा अधिक होतील. त्याची आकडेवारी आपण देऊ. 
- ऍड. अजित गोगटे, माजी आमदार, भाजप 

देवगड : सिंधुदुर्गातील राणे म्हणजे बुडीत गेलेली कंपनी आहे. त्यांचा समाज व राजकारणासाठी काहीही उपयोग नाही. विकासापेक्षा केवळ उपद्रवमूल्य दाखवणे एवढेच त्यांचे काम राहिले आहे. त्यामुळे त्यांची टीका फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज जामसंडे येथे पत्रकार परिषदेत केली. विकासापेक्षा कुरघोडीच्या राजकारणात राणेंना अधिक रस असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. 

देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीच्या तसेच आमदार नीतेश राणे यांनी गोगटेंवर केलेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर जामसंडे येथील पक्ष कार्यालयात श्री. जठार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते. 

श्री. जठार म्हणाले,''भाजप व शिवसेना युतीचा प्रचार प्रभागनिहाय घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे काम जोरात सुरू आहे. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. केंद्रात, राज्यात युतीची सत्ता असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या, बंदिस्त गटार योजना, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, पर्यटनात्मक विकास कामांबाबतच्या स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा सोडवण्याची ताकद असल्यामुळे जनता युतीच्या बाजूने निश्‍चितच कौल देईल. युतीचा नगराध्यक्ष बसल्यावर येथील प्रलंबित नळयोजनाही पूर्णत्वास नेण्यास सुलभ जाईल. 

मच्छीमारांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या आनंदवाडी प्रकल्पाला आवश्‍यक असलेली पर्यावरण विभागाची मंजुरी प्राप्त होत आहे. पर्यायाने येथील बाजारपेठ, व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल. त्यामुळे नागरिकांनी युतीच्या उमेदवाराच्या पदरी मतांचे माप टाकावे. देवगडच्या विकासामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी युतीला मतदान करून मतदारांनी घ्यावी.'' 

Web Title: BJP leader Pramod Jathar criticizes Narayan Rane