गुहागरला भाजपमध्ये घरवापसीचा वेग वाढला...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

राष्ट्रवादीचे युवा नेते मंगेश जोशींसह वाघांबे, उमराठमधील ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश
गुहागर - आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलेल्या अनेकांची घरवापसी भाजपने सुरू केली आहे. संदीप गोरिवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश जोशी, उमराठमधील पाच वाड्या व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच शीरमधील बाळकृष्ण आंबेकर यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील भाजपला अच्छे दिन येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
सात वर्षांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात संपर्क सुरू केला. कार्यकर्त्यांना खंबीर नेतृत्वाचा आधार मिळाल्याने गावागावात राष्ट्रवादी भक्कम होऊ लागली. विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या बालेकिल्ल्यातून आमदार जाधव निवडून आले.

त्यानंतर राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली.  २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १० पैकी ९ पंचायत समिती सदस्य व ५ पैकी ४ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले.  गुहागर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. 

या काळात भाजपची स्थिती फारच नाजूक होती; मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साह आला. गुहागर विधानसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढताना भाजपला हार पत्करावी लागली, तरी सध्या भाजप उभारी घेत आहे. 

उमराठ येथील संदीप गोरिवले यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य व पाच वाड्यांतील ग्रामस्थांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कमळ पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फुलवणार असे संदिप गोरिवले यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले. शीरचे बाळकृष्ण आंबेकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.  कारुळ येथील संपूर्ण ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात घेणारे युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष मंगेश जोशी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सुरेश सावंत यांच्या पाठोपाठ मंगेश जोशी भाजपमध्ये आल्याने अंजनवेल जिल्हा परिषद गटातील भाजपची ताकद वाढली आहे.  रविवारी सकाळी वाघांबे येथे भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिरगांवकर, तालुकाध्यक्ष विठ्ठल भालेकर, तालुका प्रभारी यशवंत बाईत, तालुका सरचिटणीस अभय भाटकर व निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: bjp party entry by uamrath people