रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपमध्ये बंडाळी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

काही दिवसांपूर्वीच तालुकाध्यक्ष पदावरून भाजपमधील वाद पेटला होता. जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी मुन्ना चवंडे यांची तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर बाळ माने यांच्या गटातील दादा दळी यांनी या नियुक्तीला विरोध करत समर्थकांची बैठक घेतली होती.

रत्नागिरी - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांनी पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने शहरातील आपली ताकद दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले असले तरी अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

काही दिवसांपूर्वीच तालुकाध्यक्ष पदावरून भाजपमधील वाद पेटला होता. जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी मुन्ना चवंडे यांची तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर बाळ माने यांच्या गटातील दादा दळी यांनी या नियुक्तीला विरोध करत समर्थकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये ही नियुक्ती अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर भाजपने पाच वर्षामध्ये काय केले, हे जनतेसमोर ठेवण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या परिषदेलाही बाळ माने अनुपस्थित होते. यावरून माजी आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद लाड असे दोन गट प्रकर्षाने दिसत होते. राज्यातील राजकीय परिस्थितीवरून भाजपने आपली भूमिका बदलत स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऍड. दीपक पटवर्धन यांनी आज नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने येथे नसल्याने ते गैरहजर राहिल्याचे सांगितले जात होते. 

हेही वाचा - नीलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर हाच मुद्दा आणणार पण आम्ही... 

भाजपमधील वाद चव्हाट्यावर

भाजपमधील नाराज आणि माजी शहराध्यक्ष मुकुंद जोशी यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जोशी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. नगराध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते. तसे त्यांनी पक्षातील वरिष्ठांना सांगितले होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंड केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील हे वाद चव्हाट्यावर आल्याने निवडणुकीत पक्षाची हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा - सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून यांचा अर्ज 

बाळ माने आमच्याबरोबरच - रवींद्र चव्हाण 

आमदार रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ""बाळ माने आमच्याबरोबर आहेत. काही कामानिमित्त ते आज उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु यापुढे ते मोठ्या जोमाने सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होतील.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Rebellion In Ratnagiri City President Election