आमदार केसरकरांनी `या` मुद्द्यावर आंदोलन केल्यास भाजप देणार पाठींबा

BJP Support MLA Deepak Kesarkar On Multi specialty Agitation
BJP Support MLA Deepak Kesarkar On Multi specialty Agitation

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - चांदा ते बांदापाठोपाठ आता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवरून स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना शिवसेनेने टार्गेट केले आहे. त्यामुळे दोन्ही विषयांना घेऊन केसरकरांनी आंदोलन उभे करावे. भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे सांगितले. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध भ्रष्टाचारांबाबत भाजप लवकरच आंदोलन उभे करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

श्री. तेली यांनी येथील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, संदीप गावडे, तसेच नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते.

श्री. तेली म्हणाले, ""गेले काही दिवस मल्टिस्पेशालिटीवरून शिवसेनेत अंतर्गत राजकारण सुरू आहे. चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना देवेंद्र फडणवीस सरकारने सिंधुदुर्ग व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी राबवली; मात्र ती अचानक बंद केली. त्याचप्रमाणे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवरूनही शिवसेनेकडून कुरघोडी सुरू झाली आहे. एकूणच हा प्रकार लक्षात घेता अन्यायाच्या विरोधात केसरकर यांनी नेतृत्व करून आंदोलन उभे करावे. आज नगरविकासमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे शहरात मोफत जागा मागणे हे चुकीचे आहे. एकीकडे मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांनी हॉस्पिटलसाठी मोफत जागा मिळावी, याकरिता निधीची तरतूद करावी.'' 

जागेवरून भाजपची भूमिका काय असे त्यांना विचारले असता संपूर्ण सावंतवाडीकर जनता एकत्र बसून ज्या जागेवर शिक्कामोर्तब करेल त्याला भाजपचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ""जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन करून जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू केले आहे. एकीकडे शेतीची कामे युद्धपातळीवर सुरू असताना सर्वत्र लॉकडाउन करणे चुकीचे आहे. ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे हा निर्णय कशासाठी ? त्यामुळे प्रशासनाच्या या सावळागोंधळ कारभाराबाबत निश्‍चितच जाब विचारला जाईल. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारी बॅंका कर्जमाफी द्यायला तयार नाहीत. जोपर्यंत शासनाचे पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत कर्जमाफी देणार नाही असे ते सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. खताच्या बाबतीतही जिल्ह्यात गोंधळ निर्माण झाला असताना पालकमंत्री उदय सामंत यांचा कुठलाही अंकुश प्रशासनावर नाही. दुसरीकडे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्यांना शासन अनुदान मिळण्यासाठी पालकमंत्री 29 तारखेला फतवा काढत एका दिवसात 30 तारखेला पैसे भरा, असे सांगतात हे कितपत योग्य आहे ?'' 

जिल्ह्यातील शासनाच्या दक्षता कमिटीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांना घेणे अनिवार्य आहे. तसा शासन निर्णय आहे; मात्र भाजपला सोडून राष्ट्रवादीला पालकमंत्र्यांनी विरोधी पक्ष बनविले आहे. राष्ट्रवादीची माणसेच या कमिटीत आहेत. त्यामुळे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, अन्यथा आंदोलन काय असते हे दाखवून देऊ, असा इशाराही श्री. तेली यांनी दिला. 

जिल्ह्यात भ्रष्टाचार बोकाळला असून अधिकारी 50 लाखांची लाच मागतो, असे सत्ताधारी आमदार जाहीर बोलत आहेत. मुळात राजरोसपणे दारूच्या गाड्या परजिल्ह्यात धावताहेत. अवैधरित्या क्रशर बिनधास्तपणे सुरू आहेत. ज्यांच्या घराला तडे गेले त्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळत नाही. या सर्व प्रकारांना कोण पाठीशी घालत आहे ? यामागे कोण मोठा अधिकारी आहे ? त्याचे नाव लवकरच समोर येईल; मात्र या सर्व प्रकाराबाबत भाजप आंदोलन छेडेल. 
- राजन तेली

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com