"एमआयडीसी हवी अन् रिफायनरी नको असे का"..?

BJP taluka president Abhijit Gurav commented on rifaynari project in rajapur
BJP taluka president Abhijit Gurav commented on rifaynari project in rajapur

राजापूर (रत्नागिरी) :  रोजगार आणि विकासाच्या मुद्यावर सोलगाव-बारसू परिसरातील प्रस्तावित एमआयडीसीला शिवसेना आणि सेनेचे उपसभापती प्रकाश गुरव यांच्या पाठींबा देण्याच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे एक लाखाहून अधिक लोकांना रोजगार देणार्‍या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध का ? त्याच्यातून रोजागार निर्मिती आणि विकास होणार नाही का ? असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी उपस्थित केला आहे.

तालुक्याचा विकास व्हावा आणि स्थानिकांना रोजगार मिळावा असे वाटत असेल तर, शिवसेनेच्या या पदाधिकार्‍यांनी रिफायनरी प्रकल्पाची मागणीही लावून धरावी असे आवाहन श्री. गुरव यांनी केले आहे.  तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प आणि आयलॉग प्रकल्प यांच्यावरून गेले दशकभर राजापूर तालुका चर्चेत राहीला आहे. आता प्रस्तावित सोलगाव-बारसू एमआयडीसीवरून पुन्हा एकदा चर्चेत येत तालुक्याचे वातावरण तापू लागले आहे.

बारसू परिसरातील शेतकरी विनायक कदम यांनी या परिसरातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न आणि जमीन खरेदी-विक्री व्यवहार या उपस्थित केलेल्या मुद्द्यांनी एमआयडीसी चर्चेत आली. त्यानंतर, काल पंचायत समितीचे उपसभापती श्री. गुरव यांनी एमआयडीसीच्या परिसरातील पाच गावांच्या सरपंचांच्या उपस्थितीमध्ये विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर एमआयडीसीला पाठींबा देत त्याची उभारणी व्हावी अशी भूमिका मांडली. त्यातच, या परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या भूमिकेवर भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. गुरव यांनी प्रतिक्रीया दिली.

हेही वाचा- कोकणात  आधि कोरोना नंतर सारी आणि आता लेप्टोचा शिरकाव ;  ओटवणेत आढळला लेप्टोचा रुग्ण... -
यावेळी बोलताना श्री. गुरव म्हणाले की “ श्री. गुरव यांचे एमआयडीसीला पाठींबा देण्याच्या भूमिकेचे स्वागत. पण, रोजगारासाठी एमआयडीसीला पाठींबा देत असाल तर, एमआयडीसीतून निर्माण होणार्‍या रोजगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त रोजगार निर्मिती होणार्‍या रिफायनरीला विरोध का ? कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतून कोकणातील मूळ गावी परतलेल्या अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यातून, त्यांच्यावर बेकारीचे संकट ओढवले आहे. भविष्यात रोजगार मिळणार की नाही याची त्यांना चिंता सतावत आहे. अशा लोकांच्या व्यथा सेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी जाणून घ्याव्यात अन् अनुभवाव्यात. रिफायनरी झाल्यास या बेकार तरूणांसह लोकांना निश्‍चितच रोजगार मिळेल. त्यामुळे एमआयडीसी हवी अन् रिफायनरी नको अशी शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेवू नये. ”

तर, चौकशी होवून जावू दे...

एमआयडीसी परिसरातील जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी उपसभापती प्रकाश गुरव यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचाही भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी समाचार घेतला. रिफायनरी असो की एमआयडीसी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारी मंडळी ही शिवसेनेची असल्याचा आरोप श्री. गुरव यांनी केला. रिफायनरी जमीन खरेदीत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा सहभाग उघड झाला असून काहींवर गुन्हेही दाखल झाले. त्यामुळे या ठिकाणच्या व्यवहारांचीही चौकशी होऊनच जाऊदे असेही श्री. गुरव यांनी सांगितले.

 संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com