युतीपेक्षा एकमेकांविरोधातच लढण्याची खुमखुमी अधिक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपालिका, एका नगरपंचायतीत होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये युती होण्यापेक्षा खरी लढत होण्याची शक्‍यता आहे. परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने कॉंटे की टक्कर अपेक्षित आहे. गेले काही दिवस दोन्ही पक्षांमध्ये मोठी ओढाताण सुरू असून राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसपेक्षा एकमेकांविरुद्धच लढण्याची ईर्षा अधिक दिसून येत आहे. दोघांच्या भांडणात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडी कसा फायदा करून घेते हे बघणे रंजक ठरणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. 

भाजप-शिवसेना राज्यात सत्तेवर आहे; मात्र भाजपने प्रत्येक वेळी शिवसेनेची नाकाबंदी केली. यामुळे शिवसेनेमध्येही भाजपच्या विरोधात खदखद आहे. कोकणात सेनेचे आमदार असून भाजपचा एकही आमदार, खासदार नाही. यामुळे पालिका निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे; परंतु सेनेचे प्राबल्य पाहता दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी जोरदार स्पर्धा होईल, यात शंका नाही. 

राज्याच्या पक्षनेतृत्वाने पालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली; पण जिल्ह्यातील चार नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती होण्याची शक्‍यता नसल्याचेच जिल्हास्तरावरील नेते सांगत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने वा पदाधिकारी यापैकी कोणीही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेने युतीसाठी जाहीर संमती दिली आहे. 

भाजपच्या एका स्थानिक नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, मागील निवडणुकीप्रमाणे जागावाटप व निवडणुका एकत्रितपणे लढवण्याची वेळ कधीच निघून गेली. वरिष्ठांनी याची दखल घ्यायला हवी होती. विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच भाजपने पुढील कोणत्याही निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करायची नाही, असे ठरवले. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून स्वबळाचाच नारा दिला जातोय. तशी रणनीतीही आखली. अनेक उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी प्रभागात प्रचाराला सुरवात केली. अशा वेळी माघार कोणाला घ्यायला लावायची. आता माघार घ्यायची नाही, असे उमेदवार, कार्यकर्तेही बोलत आहेत. वेळ निघून गेल्यानंतर झालेली युतीची घोषणा ही केवळ दिखाव्यासाठीच आहे की काय, असा प्रश्नही दोन्ही पक्षांमधून पुढे येत आहे. 

पाठोपाठच्या निवडणुकांचे काय? 

प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांमधून काहीजण उमेदवारी मिळण्याच्या हमीवर प्रवेशकर्ते झाले. त्यांना उमेदवारी मिळाली व अर्जही भरून झाले. युती झाली तर जुन्या निष्ठावंतांना माघार घ्यायला लावायची की, नव्याने आलेल्यांना हा प्रश्‍न जिल्हा नेत्यांना पडला आहे. पालिका निवडणुका झाल्या की पुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये युती करण्यास विरोधच केला जात आहे.

Web Title: BJP trying to fight civic polls all alone in Ratnagiri