राठोडांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून रास्ता रोको 

bjp's agitation kudal konkan sindhudurg
bjp's agitation kudal konkan sindhudurg

कुडाळ (सिंधुदुर्ग) - वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या रणरागिणींनी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावर रास्तारोको केला. कारवाई न झाल्यास 5 हजार महिलांचे भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी दिला. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्यावतीने आज कुडाळ-वेंगुर्ला रस्ता काही तास रोखून धरण्यात आला. त्यामुळे शहरातील वेंगुर्ला रस्त्यावर वाहतूक काही वेळ ठप्प होती. राठोड यांच्यावर कारवाई न झाल्यास 5 हजार महिलांचे भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिला. 

"निषेध असो, निषेध असो, ठाकरे सरकारचा निषेध असो,' "मुर्दाबाद, मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद,' अशा घोषणांनी सरकारचा निषेध करण्यात आला. कोविड-19ची खबरदारी घेत आंदोलन यशस्वीपणे पार पाडले. तेरसे म्हणल्या, ""जर वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेत नसतील तर त्यांनी स्वतःचा राजीनामा द्यावा. ते गुन्हेगारांना शासन करू शकत नसतील तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो.

छत्रपती शिवरायांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असेल तर याला ठाकरे सरकारमधील मंत्री जबाबदार आहेत. वेळीच कारवाई झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त महिलांना आज रस्त्यावर आणले नाही. वादग्रस्त मंत्री राठोड यांच्यावर आठ दिवसांत कारवाई नाही झाली तर जिल्ह्यातच पाच हजार महिलांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल.'' 

यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, नगरसेविका अश्‍विनी गावडे, मंडल अध्यक्ष आरती पाटील, शहराध्यक्ष ममता धुरी, उपाध्यक्ष मुक्ती परब, रंजना दळवी, ग्रीष्मा कुंभार, अक्षता कुडाळकर, विशाखा कुलकर्णी, तेजस्विनी वैद्य, स्मिता दामले, सुप्रिया वालावलकर, वृंदा गवंडलकर, वनिता जुवेकर आदींचा आंदोलनात सहभाग होता. 

पोलिसांकडून कारवाई 
येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. यावर ""हे सरकार न्याय मागणाऱ्या महिलांचा आवाज चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे,'' अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, नगरसेवक सुनील बांदेकर, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, पिंगुळी शहराध्यक्ष अजय आकेरकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष चंदन कांबळी, सचिन तेंडुलकरसह आदी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com