शिवसेनेची शिवथाळी पाच रुपयांना अन् भाजपची कमळथाळी...

BJPs Rane Against Shiv Sena In Sindhudurg Marathi News
BJPs Rane Against Shiv Sena In Sindhudurg Marathi News

देवगड ( सिंधुदुर्ग ) - राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकीय क्षेत्रात आपली बाजू जनतेसमोर वरचढ ठरण्यासाठी राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू असतो. हवी असते फक्‍त त्यांना एक संधी. असेच काहीसे सध्या सुरू असून शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला भाजपच्या कमळथाळीचा उतारा असल्याचे दिसते. शासनाची शिवभोजन थाळी पाच रुपयांत, तर भाजपकडून चक्‍क मोफत थाळी देऊन कोरोनासारख्या कठीण परिस्थितीमध्येही राजकीय कडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने दहा रुपयांत शिवभोजन देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित युती म्हणून निवडणूक लढवली होती. तत्कालीन स्थितीत जनतेला आकर्षित करून युतीच्या जागा वाढण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होता; मात्र निवडणूक निकालानंतर घडले भलतेच. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने भाजपची साथ सोडून वेगळी वाट निवडली. राजकीय साठमारीत शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. राज्यात शिवशाहीचे सरकार सुरू झाल्यावर शिवभोजनाचा विषय आपोआपच चर्चेत आला. याच दरम्यान कोरोनाने डोके वर काढल्याने राजकीय विषय मागे पडला.

शासन-प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी जनता एकत्रित झाली. राज्यात लॉकडाउन झाल्याने व्यापार, उद्योग थंडावले. कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाल्यामुळे कठीण प्रसंगात राज्य शासनाकडून शिवभोजनचा पर्याय समोर आणला गेला. गरीब, गरजू तसेच लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्यांना पाच रुपयांत शिवभोजनचा आधार दिला गेला. त्याला गरिबांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागताच शिवसेनेचे कट्टर विरोधक आमदार नीतेश राणे यांनी "शिवभोजन'ला टक्‍कर देण्यासाठी "कमळ' थाळी सुरू केली. शिवभोजन पाच रुपयांत, तर भाजपच्या नीतेश राणे यांनी चक्‍क मोफत थाळी दिल्याने शिवसेनेवर जणू राजकीय कडी करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

नीतेश राणेंनी साधला नेम 

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून राणेंच्या दृष्टीने शिवसेना एक नंबरचा राजकीय शत्रू झाला आहे. अशाच स्थितीत त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या नीतेश राणे यांना कधी आणि कशी संधी साधावी याचे बाळकडू आधीच मिळाल्याने मोक्‍याच्या वेळी नेम साधण्यात ते माहिर आहेत. त्यांनी पाच रुपयांच्या शिवभोजनाला मोफत कमळथाळी देऊन राजकीय संधी साधली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com