चिपळुणात बेकरीत स्फोट झाल्याने महिला जखमी 

चिपळुणात बेकरीत स्फोट झाल्याने महिला जखमी 

चिपळूण - बहादूर शेख नाका येथील क्वालिटी बेकरीत आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन महिला कामगार जखमी झाली. स्फोटाच्या तीव्रतेने इमारतीचा काही भाग कोसळला. बेकरीमधील साहित्याचेही नुकसान झाले. या महिलेला तातडीने उपचारासाठी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सरिता सावर्डेकर (वय 47) असे स्फोटात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

बहादूरशेख नाका येथे वर्दळीच्या ठिकाणी क्वालिटी बेकरी असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. आज सकाळी देखील रविवार असल्याने बेकरीत एरवीपेक्षा जास्तच गर्दी होती. पावणेदहाच्या सुमाराला बेकरीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असताना अचानक मोठा आवाज आला. काय झाले हे न कळल्याने ग्राहकांची पळापळ झाली. नेमका कसला स्फोट झाला हे बराचवेळ ध्यानात येत नव्हते. किचनमधून धूर येऊ लागल्यानंतर ग्राहक आणि बेकरीतील कामगारांची पळापळ सुरू झाली.

हा स्फोट तेथील बायोगॅससाठी वापरण्यात आलेल्या बॉयलरचा असल्याचे लक्षात आले. नंतर अग्निशामक दल आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे बहादूरशेख नाक्‍यावरील रस्ता गर्दीने भरला होता. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार देसाई यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करण्याचा पोलिसांना आदेश दिला. पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पाहणी केली. तपासणीत बेकरीत फायर फायटिंग सामुग्री नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

तोवर बेकरी सुरू करू नये 
बेकरीत आठ ते नऊ भरलेले गॅस सिलेंडर होते. सुदैवाने त्यांना धोका पोचला नाही. या बेकरीचे काही बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप खेर्डीचे माजी सरपंच प्रशांत यादव यांनी केला आहे. या स्फोटाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बेकरी सुरू करू नये अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com