भाट्ये, मिऱ्या किनाऱ्यावर आढळले 'ब्ल्यू बटणफिश'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

रत्नागिरी - रत्नागिरीतील मांडवी वगळता इतरत्रच्या भाट्ये, मिऱ्या तसेच मिऱ्यापासून पश्‍चिमेला असलेल्या पुंगळी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारी "ब्ल्यू बटणफिश' मोठ्या प्रमाणावर आढळून आले. मांडवी किनारी स्वच्छता मोहीम झाली, त्या दिवशीच इतरत्र हे फिश आढळत असताना मांडवी समुद्रात त्यांचा मागमूस नव्हता, ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्या चार दिवसांत ते मोठ्या प्रमाणावर दिसून आले; मात्र गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून मिऱ्या किनाऱ्यावर त्याचा आढळ होता, अशी माहिती हौशी छायाचित्रकार मिथिलेश पारकर यांनी दिली.

हे मासे जेलीफिशसारखे दिसत असले, तरी ते जेलीफिश नव्हेत. त्यांना "ब्ल्यू बटणफिश' म्हणतात. त्यांचे शास्त्रीय नाव "पॉर्पिटा पॉर्पिटा' असेच आहे. जेलीफिशप्रमाणे याचे अंग मऊ अथवा मृदू नसते, तर ते बटणासारखे टणक असते. या माशाच्या मधोमध असलेले छिद्र हेच त्याचे तोंड आणि येथूनच तो उत्सर्जनही करतो. पारकर हे सडामिऱ्यापासून पश्‍चिमेला फारशी वर्दळ नसलेल्या किनारी छायाचित्रणासाठी गेले होते. तेथे त्यांना ब्ल्यू बटणफिश आढळले. हे मासे स्वतः पोहू शकत नाहीत, फक्त तरंगतात; मात्र पाण्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा याप्रमाणे ते जातात, अशी माहिती पारकर यांनी दिली. मिऱ्या आणि भाट्ये किनारी आढळलेले ब्ल्यू बटणफिश मृत पावले असून ते आता कुजण्यासही सुरवात झाली आहे.

ब्ल्यू बटणफिश व जेलीफिश हे वाळूवर येत नाहीत. ते खोल पाण्यातच आढळतात. जिल्ह्यातील किनारपट्टीवर ते अपवादानेच आढळतात. हे मासे पायाला लागले तर खाज सुटते. ते थोडे विषारीही असतात. रत्नागिरी किनारपट्टीला 30 वर्षांपूर्वी 1985 च्यादरम्यान हे मासे दिसल्याची आठवण बुजुर्ग मच्छीमार वस्ता (मिरकरवाडा) यांनी सांगितली. 15 वर्षांपूर्वीही काही प्रमाणात असे मासे आढळले होते.

Web Title: blue buttonfish on bhatye, mirya beach