मासेमारीच्या नौका मिरकवाड्यातच उभ्या ; काय आहे कारण ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

शासनाच्या आदेशानुसार, १ सप्टेंबरपासून पर्ससीननेट मच्छीमारीला सुरवात होणार आहे.

रत्नागिरी : ट्रॉलिंग, गिलनेटपाठोपाठ १ सप्टेंबरपासून पर्ससीननेटद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे. कोविडमुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम खलाशांच्या आगमनावर होईल. काही पर्ससीननेटधारकांना खलाशांअभावी नौका बंदरात उभ्या ठेवण्याची वेळ येणार आहे.

डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार ५ फेब्रुवारी २०१६ ला पर्ससीन, रिंगसीन (मिनी पर्ससीन) मासेमारीवर प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्ससिन परवानाधारक नौकांवर निर्बंध घालण्यात आले होते. ५०० मीटर लांब, ४० मीटर उंची, २५ मिलिमीटरपेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी निश्‍चित करून दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार, १ सप्टेंबरपासून पर्ससीननेट मच्छीमारीला सुरवात होणार आहे.

हेही वाचा - सातत्याने काजूच्या दरात घसरण, काय आहेत कारणे? वाचा...

मागील हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गणित कोलमडले होते. काही काळ मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्याचा आर्थिक भूर्दंड मच्छीमारांना बसला होता. यंदा सुरवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ई-पास काढण्यापासून त्यांना क्‍वारंटाईन करून ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. काही नौकांनी ठाणे, पालघर येथून खलाशी आणून ठेवले आहेत. कर्नाटक, ओरिसा, बिहार या राज्यांतून येणाऱ्यांसाठी खटपट सुरू आहे. या गडबडीत २५ ते ३० टक्‍केच पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील अशी शक्‍यता आहे.

जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्‍यातच या नौका आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही मासेमारी सुरू होणार आहे. कर्नाटकबरोबरच नेपाळमधील अनेकजण बोटींवर काम करण्यासाठी गेल्या काही वर्षात कोकणात येत आहेत. कोरोनामुळे नेपाळमधून भारतात येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

हेही वाचा - वेंगुर्लेवासीयांच्या चिंतेत वाढ, प्रशासनाचीही एकच धावपळ...

अनेक नेपाळी येऊ शकलेले नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी अन्य राज्यातील किंवा ठाणे, पालघर येथील लोकांचा पर्याय मच्छीमारांना अवलंबावा लागणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. एका बोटीवर २५ ते ३० खलाशी काम करतात. जिल्ह्यात खलाशी म्हणून काम करण्यासाठी सुमारे ८ ते ९ हजार जण मासेमारी हंगामात येतात. महिन्याचा एका खलाशाचा खर्च किमान दहा हजार रुपये इतका आहे.

"मासेमारी हंगाम सुरू झालेला आहे. त्यानुसार अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी बंदरांवर मत्स्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे."

- एन. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the boats are standing in mirkwada port due to scarcity fishermen in ratnagiri