वादळसदृश स्थितीने ५०० नौका खाडीत आश्रयाला | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै : वादळसदृश स्थितीने ५०० नौका खाडीत आश्रयाला

हर्णै : वादळसदृश स्थितीने ५०० नौका खाडीत आश्रयाला

हर्णै : गेले चार ते पाच दिवस सततच्या बिघडलेल्या वादळसदृश वातावरणामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे मच्छीमार बांधव धास्तावले आहेत. त्यांनी जयगड, दाभोळ व आंजर्ले खाडीचा आश्रय घेतला आहे. या तिन्ही ठिकाणी पाचशेहून अधिक नौका आल्या आहेत. सध्या बंपर मासळी मिळायला लागली होती. त्यातच हवामान खराब झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार आहे.

सध्या केवळ हर्णै बंदरातील हजारो नौकांपैकी सहा आणि दोन सिलिंडरच्या ५० टक्के नौका मासेमारीकरिता बाहेर पडल्या आहेत. परंतु सुरुवातीपासूनच मासळीची आवकच कमी झाली होती. सर्व खर्च अंगावरच पडत होता.

हेही वाचा: शिवशाही बस संप काळात गायब; प्रवाशांची होतेय गैरसोय

आता काही दिवसांपूर्वीच म्हाकूळ, पापलेट, सुरमई अशा प्रकारची मासळी मोठ्या प्रमाणात मिळायला सुरुवात झाली होती; पण येणाऱ्या मालाला व्यवस्थित दर मिळत नव्हता, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. त्यात गेले दोन दिवस तर सायंकाळी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारेही वाहू लागले आहेत. त्यामुळे मच्छीमार धास्तावले आहेत.

वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका जयगड, आंजर्ले आणि दाभोळ खाडीत आणल्या आहेत. ज्या ठिकाणी मच्छीमार मासेमारी करत होते तिथे वातावरण बिघडल्याने जवळपासच्या खाडीचा आश्रय मच्छीमारांनी घेतला आहे. अजून तीन ते चार दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे ही स्थिती निवळल्याशिवाय पुन्हा मच्छीमार समुद्रात मासेमारीला जाणार नाहीत, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

नौका परत - जयगड खाडी- १५० , दाभोळ खाडी- ५० , आंजर्ले खाडी- ३००

loading image
go to top