माठेवाडातील रहिवाशी का म्हणतायत लढाई जिंकलो, यापुढेही अशीच एकी...

रुपेश हिराप
Thursday, 10 September 2020

माठेवाडा आत्मेश्‍वर मंदिर परिसरात असलेल्या दामोदर भारती मठात गिरी कुटुंबीयांकडून दफन केलेल्या श्रीकृष्ण गिरी यांच्या पार्थिवावरुन गिरी कुटुंबीय व स्थानिक रहिवासी, असा वाद होता.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - माठेवाडा येथील रहिवाशांचा गिरी कुटुंबीयांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही किंवा त्यांच्या विरोधातही नाही. दामोदर भारती मठात पार्थिव दफनावरून जी लढाई होती, ती वैचारिक होती आणि ती सर्वांच्या एकोप्यामुळे जिंकलो. त्यामुळे मागाहून होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळावा, अशी भूमिका आज माठेवाडा येथील रहिवाशांनी पत्रकार परिषदेत मांडली. 

माठेवाडा आत्मेश्‍वर मंदिर परिसरात असलेल्या दामोदर भारती मठात गिरी कुटुंबीयांकडून दफन केलेल्या श्रीकृष्ण गिरी यांच्या पार्थिवावरुन गिरी कुटुंबीय व स्थानिक रहिवासी, असा वाद होता. हा वाद उपविभागीय न्यायदंडाधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत खांडेकर यांच्या न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी हे पार्थिव बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे पार्थिव काल रात्री उशिरा बाहेर काढून उपरलकर स्मशानभूमीत दफन करण्यात आले. 

एकूणच या सगळ्या घडामोडीनंतर आज माठेवाडा येथील रहिवाशांनी आत्मेश्‍वर मंदिरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. पुंडलिक दळवी व किरण सिद्धये यांनी विचार मांडले. अमित सावंत, भूषण कुलकर्णी, नंदू गावडे, दीपक सावंत, आनंद मोघे, सुनिल केळुसकर, वल्लभ गवस बाळू घाटे, स्नेहा वझे, कमला पुरोहीत, कांचन सिद्धये, मिलींद चोणकर, राजा घाटे, कुणाल सावंत आदी उपस्थित होते. 

भविष्यात असे प्रकार नको 
अरुण वझे म्हणाले, ""रहिवाशांनी जो काही लढा उभारला होता तो गिरी कुटुंबीयांच्या वैयक्तिक विरोधात नव्हता. तो वैचारिक होता. यापुढेही सर्व गोष्टी एकत्र येऊनच लढू.'' देवस्थान कमिटीचे ऍड. समी ख्वॉंजा म्हणाले, ""काहीजण गैरसमज पसरवत आहेत. भविष्यात पुन्हा मठात असा प्रकार होऊ नये, यासाठी देवस्थान कमिटी योग्य कार्यवाही करेल.'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Body case Sawantwadi Mathewada konkan sindhudurg