esakal | प्रवाशांमध्ये खळबळ: कुडाळ रेल्वे स्थानकावर दोघे पॉझिटीव्ह

बोलून बातमी शोधा

प्रवाशांमध्ये खळबळ: कुडाळ रेल्वे स्थानकावर दोघे पॉझिटीव्ह
प्रवाशांमध्ये खळबळ: कुडाळ रेल्वे स्थानकावर दोघे पॉझिटीव्ह
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेने आलेल्या सुमारे 350 हून अधिक प्रवाशांची आरोग्य विभागाच्या पथकाने थर्मल स्क्रिनींग तपासणी केली. यातील कोरोनाची लक्षणे असलेल्या संशयित 20 जणांची ऍन्टीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी केली जात आहे. कुडाळ रेल्वे स्थानकावर तालुका आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी पथक कार्यान्वित केले असून येथे रॅपिड टेस्टही सुरू केली आहे. मुंबई व अन्य भागातून कोकण रेल्वेने बुधवारी (ता. 21) दिवसभरात सुमारे 350 हून अधिक चाकरमानी व प्रवाशी उतरले. या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी पथकाने थर्मल गन, ऑक्‍सीमिटरने तापमान व ऑक्‍सिजन पातळी तपासून सर्व प्रवाशांचे फोन नंबर, पत्ता, ट्रेन नंबर, कोच नंबरसह आसन क्रमांक आदी आवश्‍यक माहिती रजिस्टरमध्ये नोंद केली.

हेही वाचा- राजापूरवासियांची चिंता वाढली: चौपदरीकरणाचे काम करणारे 38 जण बाधित!

सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे 350 प्रवाशांची आरोग्य पथकाने थर्मल स्क्रिनींग तपासणी केली. कोरोनाची लक्षणे असलेल्या 20 जणांची ऍन्टीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यातील दोन जणांच्या रॅपिड टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या पुढील उपचाराबाबतची कार्यवाही करण्यात आल्याचे आरोग्य पथकाकडून सांगण्यात आले. रॅपिड टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दोन प्रवाशांच्या सोबत प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असून त्यांना खबरदारीच्या दृष्टीने आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत.

Edited By- Archana Banage