esakal | ऐसा देखिला 130 ब्रह्मकमळांचा सोहळा! 4 वर्षांत फुलली शेकडों फुले
sakal

बोलून बातमी शोधा

ऐसा देखिला 130 ब्रह्मकमळांचा सोहळा! 4 वर्षांत फुलली शेकडों फुले

ऐसा देखिला 130 ब्रह्मकमळांचा सोहळा! 4 वर्षांत फुलली शेकडों फुले

sakal_logo
By
सचिन माळी.

मंडणगड : पांढरेशुभ्र, मंद सुगंधित दोन चार नव्हे तर १३० ब्रह्मकमळांचा नैसर्गिक बहर मंडणगड शहरातील दिलीप मराठे यांच्या बिल्वदल या घरी आला. निशोन्मिलित पूर्णपणे उमळणारे ब्रह्मकमळ पाहण्याचा अवर्णनीय दुर्मिळ योग अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन तर काहींनी फेसबुक, व्हॉट्सअॅप लाइव्हच्या माध्यमातून पाहिला. २ ऑगस्टला घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मुक्तपणे वाढू दिलेल्या १० फूट उंचीच्या झाडावर एकाचवेळी १३० फुले उमलली. त्यामुळे परिसर पांढऱ्याशुभ्र फुलांनी आणि मंद सुगंधाने भारून गेला.

उपक्रमशील पदवीधर शिक्षक दिलीप मराठे यांनी, आपल्या बिल्वदल घराच्या सभोवतालच्या एक गुंठा जागेवरील परिसरात फुलझाडे, फळझाडे, भाज्या यांची परसबाग सजवली आहे. पान पूर्णतः सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला असून जणू सेंद्रिय शेतीची प्रयोगशाळाच उभारली आहे.या आधी एकाचवेळी जास्तीत जास्त ६५ फुले उमलली होती; मात्र १३० फुलांच्या बहराने पूर्ण झाड झाकोळून गेले.

हेही वाचा: कोकण - जलप्रलयात संपर्काचा दुवा ठरला सॅटेलाईट फोन

१०० फुले उमलण्याचा योग..अवर्णनीय सोहळा

सहा वर्षांपूर्वी घराच्या प्रवेशद्वारासमोर ब्रह्मकमळाचे पान त्यांनी लावले. त्याला शेणखत, गोमूत्र दिले. जीवामृताचा वापर केला. त्यामुळे सशक्तपणे भराभर वाढले. चार वर्षांत त्यावर सुमारे ४५० पेक्षा अधिक फुले फुलली आहेत. मराठे यांना २ ऑगस्टला संध्याकाळी झाडावरील कळ्या पाहिल्यानंतर त्या फुलोऱ्यावर असून १०० फुले उमलण्याचा योग असल्याचे लक्षात आले. रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांचा आकार हळूहळू वाढत गेला. बारापर्यंत या कळ्या पूर्ण फुलल्याने झाड पांढरीशुभ्र फुलांनी झाकले गेले. फुल फुलण्याचा अवर्णनीय सोहळा रात्री पावसांत अनेकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर व फेसबुकवर तर जवळच्या मित्रांनी प्रत्यक्षात घरी येत अनुभवला.

मध्यरात्री उमलणे; सूर्योदयापूर्वी मावळणे

जुलै ते सप्टेंबरदरम्यान वर्षांतून एक-दोनवेळा मध्यरात्रीच्या सुमारास ही फुले पूर्ण उमलतात. एकाच दिवशी अनेक फुले फुलणे ही आश्चर्याची गोष्ट समजली जाते. कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याच्या हेतूने रात्री उमलतात; मात्र सूर्योदय होण्यापूर्वी ही फुले मावळून जातात.

हेही वाचा: रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! शहरातील हवा प्रदूषणमुक्त

क्वीन ऑफ दी नाईट

सौंदर्यात्मक गुणधर्मामुळे याची जगभरात मोठी मागणी आहे. ब्रह्मकमळ या मराठी नावाने ओळखले जाणाऱ्या या फुलाला विविध देशांत अनेक नावांनी ओळखले जाते. बेथेलहॅम लिली, एपिफीलम ऑक्सिपेटलम नावाने ओळखले जाते. Queen of the night, चंद्रकमळ, beauty under the moon, the flower from heaven या नावाने ओळखले जाते.

loading image
go to top