#KonkanRain म्हाप्रळ - आंबेत येथे सावित्रीवरील पुलाला तडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

रत्नागिरी - जिल्ह्यात संततधार सुरु असून मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. संगमेश्‍वर तालुक्‍याला पावसाचा आज सर्वाधिक फटका बसला. मंडगणड तालुक्‍यातील म्हाप्रळ - आंबेत मार्गावर सावित्री नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. 

रत्नागिरी - जिल्ह्यात संततधार सुरु असून मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. संगमेश्‍वर तालुक्‍याला पावसाचा आज सर्वाधिक फटका बसला. मंडगणड तालुक्‍यातील म्हाप्रळ - आंबेत मार्गावर सावित्री नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. 

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 26) चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 57.11 मिमी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्‍यात 117 मिमी तर सर्वात कमी नोंद राजापुरात 23 मिमी. झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत 2054 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत चारशे मिलीमिटरने कमी आहे.

पावसामुळे गुहागर - जांभारीतील महादेव बारसकर यांच्या घराचे 4 हजार रुपयांचे तर पेवे येथे घरावर झाड कोसळून 12 हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्‍वर काटवलीतील रवींद्र गोरखनाथ घाग यांच्या घराचे अशंतः नुकसान झाले. पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

म्हाप्रळ-आंबेत मार्गावर सावित्री नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. त्यावरुन वीस टनापेक्षा मोठ्या वजनाच्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून यासंदर्भात मंडणगड तहसीलदारांना पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

चिपळूण तालुक्‍यात दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालशेत येथील रस्ता खचला असून शहराच्या सखल भागात पाणी साचले आहे. दसपटी, पोफळी, खेर्डी, मालदोली, सावर्डे परिसरात मुसळधार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या घटना घडल्या.

दोन दिवस सुरू असलेल्या संततधारेने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. वाशिष्ठी, शिवनदीने धोकादायक पातळी ओलांडली होती. जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालशेत बंदर ते पोमेंडी रस्त्यावर साईडपट्‌टी खचली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: breakages on Bridge on Savitri in Mhalprat Ambet