ओरोसबागवासीयांचा यंदाही जीवघेणा प्रवास, प्रशासन कधी होणार जागे?

bridge Work stalled Oros konkan sindhudurg
bridge Work stalled Oros konkan sindhudurg

बांदा (सिंधुदुर्ग) - कोरोना लॉकडाउनमध्ये स्थलांतरित कामगार घरी गेल्याने तेरेखोल नदीपात्रातील बांदा-आरोसबाग पुलाचे काम गेले 3 महिने बंद आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात आरोसबागवासीयांचा शहरात येण्यासाठीचा जीवघेणा होडी प्रवास सुरू आहे. गेली कित्येक वर्षे नदीपात्रातील हा होडीप्रवास सुरू आहे. 

जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने गेले आठ दिवस धूवॉंधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. दरवर्षी आरोसबागवासीयांना बांद्यात येण्यासाठी नदीपात्रात होडीचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत हाच प्रवास जीवघेणा देखील ठरू शकतो; मात्र वाहतुकीचा अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने भर पावसात देखील नदीपात्रातील होडी सेवा सुरू असते. 

नदीपात्रात पूल व्ह्यावे यासाठी आरोसबाग वाडीतील ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली. स्थानिकांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन युती शासनाने या पुलासाठी मंजुरी दिली होती. 1999 ला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाच्या कामाचे भूमिपूजन देखील केले होते; मात्र त्यानंतर राज्यात सलग 15 वर्षे कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. या कालावधीत निधी नसल्याचे कारण दिल्याने पुलाचे काम सुरू होण्यापूर्वीच पुलाचे काम लाल फितीत अडकले. वेळोवेळी पाठपुरावा करूनही पुलाचे काम सुरू होत नव्हते. 

उन्हाळ्यात ग्रामस्थ नदीपात्रात श्रमदानाने लाकडी साकव उभारून आपल्या वाहतुकीची व्यवस्था करत. पावसाळ्यात मात्र होडीशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. आरोसबाग वाडीची लोकसंख्या ही 1 हजारच्या आत आहे. शाळा, महाविद्यालय, बाजार, आरोग्य सुविधेसाठी ही वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. 

युती शासनाने पुन्हा या पुलाच्या कामासाठी मंजुरी दिल्याने 2 वर्षांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दुसऱ्यांदा भूमिपूजन करून पुलाच्या कामास प्रारंभ केला. गेली दोन वर्षे संथगतीने काम सुरू आहे. एकूण 3 पिलर उभारले आहेत. यावर्षी ग्रामस्थांनी लाकडी साकव उभारला नाही. ठेकेदाराने नदीपात्रात तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी साकव उभारून वाहतुकीची व्यवस्था केली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला साकव काढण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातून बांद्यात येण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा होडी वाहतूक सुरू केली. बांदा बाजूकडील नदी किनाऱ्यालागतची जमीन नदीपात्रात कोसळत असल्याने होडी लावण्यासाठी देखील कसरत करावी लागत आहे. 

दरवर्षी आरोसबाग ग्रामस्थ नदीपात्रातून प्रवास करण्यासाठी होडीचा वापर करतात. यामध्ये शाळकरी मुलांसह वृद्धांचा देखील समावेश असतो. यावर्षी लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांची ये-जा बंद आहे. येथील बहुतांश युवक-युवती गोव्यात नोकरीसाठी जातात. गोवा सीमा बंद असल्याने तरुण वाडीतच अडकले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत होडीतील प्रवासी संख्या कमी आहे. आरोसबाग वाडीतील ग्रामस्थांच्या शेती-बागायती या नदी पलीकडे आहेत. त्यामुळे शेती कामासाठी, अवजारांची वाहतूक करण्यासाठी होडीचा वापर करण्यात येत आहे. 
- प्रवीण सातोसकर, ग्रामस्थ, आरोसबाग  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com