काँग्रेस नेते ओसाड गावचे पाटील; ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

काँग्रेसशी दोन विषयामुळे माझे मतभेद वाढत गेले. पहिला, म्हणजे मनमोहन सिंग यांचे आर्थिक धोरण. उद्योगपतींसाठी प्रचंड फायदे व शेतकरी, कामगार, सैनिकांचे मुडदे. तेच धोरण आज भाजपचे आहे. दुसरे म्हणजे, गुंडाना, चोराना पक्षाचे नेते करणे. म्हणून प्रचंड भ्रष्टाचार वाढला.

- सुधीर सावंत

ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज स्पष्ट केले. 

काँग्रेस नेते मल्लीकार्जुन खरगे यांच्या सोबतच्या छायाचित्राचा हवाला देऊन माध्यमांमध्ये श्री. सावंत काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र विधानसभेत त्यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांना उघड पाठिंबा दिला.

याबाबतची भूमिका त्यांनी पत्रकाद्वारे आज स्पष्ट केली. यात त्यांनी म्हटले आहे की, राजकारण हा काही धंदा नाही. राजकारण देशासाठी व जनतेसाठी असेल तर ते हितकारक आहे. राजकारण जर त्यागावर आधारित असेल तर ते देशासाठी आणि जनतेसाठी लाभकारक होते. राजकारणात मी कधी स्वार्थासाठी काम केले नाही. फक्त त्याग केला आहे. नाहीतर मी कुठल्याही मोठ्या पक्षात जाऊन पद व संपत्ती मिळवली असती. काँग्रेस पक्ष मी 1999 मध्ये सावरला. पक्ष फुटला तेव्हा मोठे नेते लपून होते. महाराष्ट्रात काँग्रेस मी वाचवली, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही; पण काँग्रेसशी दोन विषयामुळे माझे मतभेद वाढत गेले. पहिला, म्हणजे मनमोहन सिंग यांचे आर्थिक धोरण.

उद्योगपतींसाठी प्रचंड फायदे व शेतकरी, कामगार, सैनिकांचे मुडदे. तेच धोरण आज भाजपचे आहे. दुसरे म्हणजे, गुंडाना, चोराना पक्षाचे नेते करणे. म्हणून प्रचंड भ्रष्टाचार वाढला. मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहिलो म्हणून मला पक्षातून काढण्याचे प्रचंड कारस्थान झाले. त्यातून मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि राजकारण सुधारण्यासाठी नवीन राजकारण निर्माण करण्यासाठी, छोटे पक्ष मोठे करण्यासाठी प्रयत्न केला. अनेक आमिषे टाळली.

राहुल गांधी आले आणि परिवर्तनाची भाषा करू लागले, म्हणून त्यांना मदत करावी, अशी भावना जागृत झाली; पण पक्षाचे नेते तेच होते. आम आदमी पक्ष मी वाढवला; पण गेल्या लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून मी आप पक्षाने निवडणूक लढू नये, ही भूमिका घेतली.

अशोक चव्हाण यांनी लोकसभा लढण्याचे मला सांगितले तेव्हा होकार दिला; पण नंतर अशोक चव्हाण बदलले. तेव्हापासून काँग्रेस नेतृत्व मला फसवत राहिले. राहुल गांधींना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले.

अलिकडे मला दिल्लीला बोलावले. तेव्हा मी खरगेना सांगितले की, सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा त्या दोन विषयावर झाल्याशिवाय पक्षात येणार नाही. माझ्या दिल्लीतील विरोधकांनी ते होऊ दिले नाही. महाराष्ट्रात माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना सन्मानाने पक्षात घेण्याबद्दल कुठलाही निर्णय झाला नाही. 24 उमेदवार मी सुचवले त्यांना तर नाकारलच; पण ज्यांची डिपॉझिट जातील, अशांना उमेदवारी दिली. सरते शेवटी मला पक्षात घ्यायचे व कोकणात सर्वांचे डिपॉझिट घालवायचे, हे कारस्थान नेत्यांनी केले. सुधीर सावंत काँग्रेसमध्ये आले; पण सर्वांचे डिपॉझिट गेले, हा अपप्रचार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सापळा रचला. तो मी हाणून पाडला, असे सावंत यांनी नमूद केले आहे.

काँग्रेसबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणे शक्‍य नाही. माझे सर्व मित्र आणि कार्यकर्ते नाराज होणे साहजिक आहे; पण काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट निर्णय घेतल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. 

काँग्रेसला मोठे नेते नकोत

राज्याच्या नेत्यांना काँग्रेसला निवडून आणायचे नाही तर बुडवायचे आहे, असे दिसते कि कुणीच मोठा नेता पक्षात आणायचा नाही. यांना फक्त ओसाड गावचा पाटील बनायचे आहे. पुढच्या काळात शेतकरी, कामगार, सैनिकांचा जीवनस्तर आनंदमय आणि संपन्न करण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. हे काम करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

दृष्ट प्रवृत्तीना नष्ट करण्यासाठी... 
कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी आणि लोकात दलाल मध्यस्थानी एक दरी निर्माण केली आहे. म्हणूनच राहुल गांधी बाहेर पडले. महाराष्ट्रात प्रचारच केला नाही. हे नीट झाल्याशिवाय, कॉंग्रेस पक्षाला भवितव्य नाही. सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे, जिथे शिवसेना - भाजप संघर्ष आहे. त्यात दृष्ट प्रवृत्तीना नष्ट करण्यासाठी मी सतीश सावंत यांना पाठिंबा दिला, असेश्री. सावंत यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brigadier Sudhir Sawant Criticism on Congress