गडनदीवरील ब्रिटिशकालीन पूल अखेर भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

कणकवली - 1934 पासून अखंड सेवा देणारा ब्रिटिशकाली गडनदी पूल भुईसपाट झाला. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल तोडत असताना शहरवासीयांच्या कडू-गोड आठवणीही दाटून आल्या होत्या. लवकरच या तोडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा तीन पदरी पूल उभा केला जाणार आहे

कणकवली - 1934 पासून अखंड सेवा देणारा ब्रिटिशकाली गडनदी पूल भुईसपाट झाला. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल तोडत असताना शहरवासीयांच्या कडू-गोड आठवणीही दाटून आल्या होत्या. लवकरच या तोडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा तीन पदरी पूल उभा केला जाणार आहे. तर जुन्या पुलालगत बांधकाम झालेल्या नव्या तीन पदरी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे.

मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मुलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश शासनाने या मार्गावरील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली. यात गडनदी पुलाचे बांधकाम 1934 मध्ये पूर्ण झाले आणि येथून वाहतूक सुरू झाली. या पुलाच्या उभारणीसाठी त्यावेळी 1 लाख 26 हजार रूपये खर्च आला होता आणि तीन वर्षात हे काम पूर्ण झाले होते.
दगड, चुना आणि मातीचा वापर केलेल्या या पुलावरून गेली 85 वर्षे अव्याहतपणे कित्तेक टनांची वाहतूक सुरू होती.

ऑगस्ट 2016 मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्‍चित केले. यात गडनदीवरील जूना पूल भुईसपाट झाला आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीने जुन्या पुलालगत नवीन तीन पदरी पूल एका वर्षामध्ये बांधला. गेल्या आठ दिवसापासून या पुलावरून वाहतूक सुरू झाली. त्यानंतर काल (ता. 20) गडनदीवरील ब्रिटिशकालीन पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.

गडनदी पुलावरून ऑक्टोबर 1968 मध्ये भजनी मंडळी असलेला ट्रक कोसळला होता. त्यावेळी शहर व परिसरातील 55 भजनी मंडळी दगावली होती. या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कणकवलीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम देखील झाला होता. दरम्यान हा पूल तोडत असताना अनेकांना या अपघाताची आठवण झाली. याखेरीज दगड आणि मातीने तयार केलेला हा पूल 85 वर्षे कसा अबाधित राहिला याचेही आश्‍चर्य नागरिकांना होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: British constructed bridge on Gadnadi destroyed