अमेरिकेचा पाहुणा आला रत्नागिरीत भरकटत

चंद्रशेखर जोशी
Friday, 16 October 2020

महाड येथील सीस्केप संस्थेने दापोली येथील डॉ. उमेश वैशंपायन यांच्या घरी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील लाडघर समुद्रकिनाऱ्यावर मास्क बुबिझ हा समुद्री पक्षी भरकटलेल्या अवस्थेत आढळून आला. उत्तर अमेरिका येथून स्थलांतर करीत असलेला हा समुद्री पक्षी अपवादाने सापडला आहे. महाड येथील सीस्केप संस्थेने दापोली येथील डॉ. उमेश वैशंपायन यांच्या घरी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.

हेही वाचा - सिंधुदुर्गातील  तो हादरा भूकंपाचाच -

सीस्केपचे प्रतिनिधी चिंतन वैष्णव, प्रेमसागर मेस्त्री, योगेश गुरव, दापोली येथील चिन्मय वैशंपायन यांनी या पक्ष्याची देखरेख सुरू केली. मास्क बुबिझ या पक्ष्याचे नशीब थोर होते. काल रात्री हा वेगळा पक्षी सोमेशप्रीत हॉटेलसमोरील समुद्रकिनाऱ्यावर देवेंद्र बागकर यांनी पाहिला व त्यांनी महाड येथील सीस्केप संस्थेत संपर्क साधला. या पाहुण्याला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मासे खाऊ घातल्याने तो चांगला चालू लागला आहे. तेथून त्याला दापोलीत

डॉ. उमेश वैशंपायन यांच्या घरी आणण्यात आले. या पक्ष्याची जन्मल्यानंतरही ही पहिलीच आकाशभरारी असल्याने आता किमान दोन महिने त्याची शुश्रूषा करावी लागेल, असा अंदाज सीस्केपचे अध्यक्ष पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी वर्तवला आहे. खरंतर हा पेलाजिक बर्ड म्हणजेच खोल समुद्री पट्ट्यातून प्रवास करणारा पक्षी आहे. तो विश्रांतीसाठी समुद्रातील बेटांवर थांबतो किंवा पाण्यावर तरंगत विश्रांती घेतो.

महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सहसा तो थांबत नाही. सीस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी हा पक्षी अंदमान निकोबार बेटावर ईला फाउंडेशनच्या समुद्रीय सर्वेक्षण मोहिमेत पाहायला मिळाल्याचे सांगितले. अशा प्रकारे वाऱ्याच्या बदलत्या प्रवाहात मास्क बुबिझचे हे पिलू असे भरकटणे म्हणजे समुद्राच्या पटलावर विविध प्रकारची स्थित्यंतरे होत असल्याचे द्योतक आहे. याचा परिणाम मानवी जीवन, शेती, बागायती यावर होऊ शकतो, असेही या वेळी मेस्त्री यांनी सांगितले.

हेही वाचा - कर्ज देण्याच्या बहाण्याने तरूणाला लाखाचा गंडा 

पक्ष्यांना जीव लागतो गमवावा 

हवामानातील बदलामुळे गेले दोन दिवस देश-विदेशातून स्थलांतर करणाऱ्या अनेक पक्ष्यांवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. वेगवान वारे तयार झाल्याने अशा अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो; तर काहींच्या मार्गात अडथळा निर्माण होतो.

 

एक नजर

- मास्क बुबिझ पक्ष्यांचा उत्तर ते दक्षिण 

- अमेरिकेत आढळ

- तीन ते चार हजार किलोमीटरचा करतात प्रवास 

- हवामानाच्या बदलाप्रमाणे होतात ते स्थलांतरित 

- समुद्रपक्षी असल्याने समुद्रातील बेटांवर दिसतात यांच्या     वसाहती

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bubiz the american see birds in dapoli beach caused by a cyclone on konkan area