इंटरनेट बॅंकिंगविना व्यवसाय कठीण - धैर्यशील पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सावंतवाडी - व्यापार व्यवसायात दिवसेंदिवस होणारा बदल लक्षात घेता इंटरनेट बॅंकिंग हा उत्तम पर्याय असून त्याशिवाय व्यवसाय चालवणे कठीण होणार असल्याचे मत ऑल इंडिया कंझ्युमर्स प्रॉडक्‍ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

सावंतवाडी - व्यापार व्यवसायात दिवसेंदिवस होणारा बदल लक्षात घेता इंटरनेट बॅंकिंग हा उत्तम पर्याय असून त्याशिवाय व्यवसाय चालवणे कठीण होणार असल्याचे मत ऑल इंडिया कंझ्युमर्स प्रॉडक्‍ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा कंझ्युमर्स प्रॉडक्‍ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन व स्नेहमेळावा येथील शिल्पग्राम मध्ये झाला. या वेळी श्री. पाटील बोलत होते. व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वंळजू, कंझ्युमर्स प्रॉडक्‍ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल मेहता, कोल्हापूर झोन फेडरेशनचे विजय नारायणपुरे, सुनील सौदागर, सलीम इसानी,  अनिल सौदागर, चेतन कापडी उपस्थित होते.

राज्य डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन वर्षाकाठी २५ हजार कोटीचा व्यापार करून शासनाला चार हजार कोटीचा महसूल मिळवून देते. आता काळ बदलत आहे. ई-बॅंकिंग, कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सर्वजण वळत आहेत. त्यादृष्टीने व्यापारातही आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल वितरकांनी स्वीकारावेत; अन्यथा ते मागे पडतील, असेही धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केले.

वितरक असंघटित व्यापार करतो. त्यामुळे व्यापार वाढत नाही. वितरक संघटित झाल्यास डिस्ट्रिब्युशनचा टक्का वाढेल. गोव्यात वितरकांची स्वतंत्र संघटना आहे. तेथे वितरकांची सर्व माहिती वेबसाइटवर प्राप्त होते.

सिंधुदुर्गातही अशी संघटना होणे गरजेचे आहे. शासनाने बॅंकांची प्रणाली सुधारावी, कॅशलेसपेक्षा चेकने व्यवहार सोयीचे असल्याचे चेतन कापडिया म्हणाले. तर दहा वर्षांनी व्यापार कसा असेल याचे चिंतन करून वितरकांनी एकत्र यावे, असे आवाहन सलीम इसानी यांनी केले. दीपक शहा, मेहता यांनीही मार्गदर्शन केले.

या मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात कॅशलेस बाबत मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास संदीप टोपले, देवा माने, विवेक नेवाळकर, सागर नार्वेकर, मिलिंद उपरकर, मनोज मळगावकर आदींसह सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगडसह जिल्ह्यातील वितरक उपस्थित होते. 

देशात कॅशलेस सुविधा तत्काळ अस्तित्वात येणे कठीण आहे. त्याऐवजी लेस कॅश हा प्रकार अस्तित्वात येऊ शकतो. जीएसटी हे व्हॅटचेच लेटेस्ट व्हर्जन आहे. फक्त जीएसटी कायद्यात अदृश्‍य व्यवहारही कराच्या टप्प्यात येणार आहेत. यापुढे विनापैसा कुठलीच सेवा मिळणार नाही. बॅंकांना मोठे महत्त्व येणार असल्याने बॅंका सशक्त राहणे काळाची गरज आहे.
- सुनील सौदागर, अधिकारी सारस्वत बॅंक

Web Title: business problem by internet banking