esakal | Kokan - चिपळूणातील सराफ व्यावसायिक संभ्रमात; प्रत्यक्ष खरेदीकडे ग्राहकांचा कल

बोलून बातमी शोधा

buyers direct selling from gold shops mini lockdown effects on market chiplun

काहींनी ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे. मात्र त्याला ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. 

Kokan - चिपळूणातील सराफ व्यावसायिक संभ्रमात; प्रत्यक्ष खरेदीकडे ग्राहकांचा कल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवायच्या किंवा चालू याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे चिपळुणातील व्यापारी संभ्रमात होते. दुकाने बंद ठेवली तर कोट्यवधी रुपयाचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. काहींनी ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे. मात्र त्याला ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. 

गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहुर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोनेखरेदी केली जाते. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापाऱ्यांना आशा होती. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

हेही वाचा - कोकण : बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका

समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने आणि वस्तू विक्रीतील मोठ्या दुकानदारांनी ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे. याबाबत चिपळूण तालुका सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष पारस ओसवाल म्हणाले, सोने ऑनलाइन खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकता नाही. 

दागिने खरेदीशी अनेकदा भावनिक नाते असते. ग्राहकांना दागिने हाताळायला अधिक आवडतात. कुटुंबासह लोक सोने खरेदीसाठी येतात. ऑनलाइन खरेदीमध्ये ते शक्‍य नसल्याने फारसा प्रतिसाद मिळत नाही. काही प्रमाणात नाणे खरेदी ऑनलाइन होते. अनेक सराफांचे पिढ्यांपिढ्या जोडलेले जुने ग्राहक आहेत. त्यांचाही प्रत्यक्ष खरेदीकडे अधिक कल असतो. नेहमीच्या ग्राहकांकडून आम्ही फोनवर ऑर्डर घेऊन त्यांना घरपोच वस्तू पोहच करत आहोत. 

पाडव्याला तरी पेढ्या उघडू द्या! 

"मोठ्या पेढ्यांना ऑनलाइनचा पर्याय आहे, परंतु लहान पेढ्या स्थानिक ग्राहकांवर अवलंबून आहेत. लोकांना सहकुटुंब येऊन खरेदी करण्यात रुची असते. म्हणून किमान पाडव्याला तरी सरकारने सोने-चांदीची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी."

- प्रफुल्ल देवरूखकर, पोफळी 

हेही वाचा - रत्नागिरीत जमावबंदीचे नियम धाब्यावर; यंत्रणेकडूनही डोळेझाक

"गेल्या वषीर्ही पाडव्याला सराफी पेढ्या बंद होत्या. यंदाही तशीच परिस्थिती आहे. सोनेविक्री व्यवसायाची अवस्था बिकट झाली आहे. बाजारात आमचे पैसे अडकले आहेत. लोकांचे दागिने बनवून तयार आहेत, पण सगळे व्यवहार ठप्प आहेत. वर्षभरात केवळ 30 टक्के व्यवसाय झाला. टाळेबंदीला आमचा पाठिंबा आहे, पाडव्याला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. "

- पारस ओसवाल, अध्यक्ष चिपळूण तालुका सराफ असोसिएशन